
प्रभादेवी येथील क्राऊन मिलच्या जागेवर उभारण्यात आलेल्या ‘रुस्तुमजी क्राऊन’ या 63 मजल्यांच्या टॉवरमधील बेकायदा अतिक्रमणावर महानगरपालिकेच्या ‘जी/दक्षिण’ विभागाने धडक तोडक कारवाई सुरू केली आहे. इमारतीतील लिफ्टच्या बाजूची सामायिक मोकळी जागा फ्लॅटमध्ये समाविष्ट करून घेण्यात आल्याच्या तक्रारीवरून पालिकेने ही कारवाई हाती घेतली आहे. यामध्ये राजकीय नेते, मंत्री आणि आमदारांच्या नातेवाईकांसह तब्बल 128 फ्लॅटस्चा समावेश आहे.
‘रुस्तुमजी क्राऊन’ टॉवरच्या 63 मजल्यांच्या तीन इमारतींपैकी दोन इमारतींना पालिकेने भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) दिले आहे. तिसऱया इमारतीला ओसी मिळालेली नाही. ए आणि बी टॉवरमधील बहुतांश फ्लॅटधारकांनी लिफ्टच्या बाजूची कॉमन स्पेस बेकायदेशीरपणे फ्लॅटमध्ये जोडून अतिक्रमण केले आहे. यासंदर्भात आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी तक्रार केली होती. या बळकावलेल्या जागेचे बाजारमूल्य 250 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारवाईच्या कक्षेत मंत्री संजय राठोड, त्यांच्या पत्नी शीतल राठोड, आमदार सदा सरवणकर यांचे चिरंजीव समाधान सरवणकर यांच्या फ्लॅटस्चा समावेश आहे. तसेच याच टॉवरमध्ये दरमहा 4 लाख 20 हजार रुपये भाडय़ाने राहणारे माजी मंत्री दीपक केसरकर राहात असलेल्या फ्लॅटवरही कारवाई होणार असल्याचे समजते. आज तीन फ्लॅटवर पालिकेने कारवाईचा हातोडा चालवला. आणखी महिनाभर तरी ही तोडक कारवाई सुरू राहील.
सखोल चौकशी करा
फ्लॅटधारकांनी फ्लॅटच्या रचनेत अंतर्गत बदल केल्याने इमारतीला धोका निर्माण होऊ शकतो. तसे फायर सेफ्टीच्या दृष्टीनेही गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. ‘रुस्तुमजी क्राऊन’ या इमारतीत बडे असामी व लोकप्रतिनिधी असल्याने या तोडक कारवाईला दिरंगाई झाली. या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी लक्ष केंद्रित करून या इमारतीतील आर्थिक घोटाळा बाहेर काढावा, यासाठी ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा दाखल करून चौकशी करावी, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी केली.





























































