तीन महिन्यांत 1 लाख 11 हजार उंदरांचा खात्मा, प्लेग, लेप्टोस्पायरोसिसला आळा घालण्यासाठी पालिकेची मोहीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्लेग आणि लेप्टोस्पायरोसिससारखे जिवघेणे आजार पसरवण्यास कारणीभूत ठरणाऱया सुमारे 1 लाख 11 हजार उंदरांचा खात्मा पालिकेने जानेवारीपासून आतापर्यंत अवघ्या तीन महिन्यांत केला आहे. या ‘मूषक नियंत्रण’ मोहिमेत प्रादुर्भाव आढळणाऱया ठिकाणी विषारी गोळय़ा टाकून आणि रात्रपाळीत उंदीरनाशक मोहीम राबवण्यात येत आहे. याशिवाय नागरिकांच्या आलेल्या तक्रारींनुसार पालिकेकडून कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती पालिकेच्या कीटकनाशक विभागाचे प्रमुख अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी दिली.

उंदीर-घुशींमुळे होणाऱया रोगांमध्ये प्लेग व लेप्टोस्पायरोसिस या रोगांचा प्रामुख्याने समावेश आहे. ‘झिनॉपसिला चिओपीस’ या पिसवा उंदीर-घुशींच्या केसात आढळतात. या पिसवांमार्फत प्लेगची लागण होते. तर लेप्टोस्पायरोसिस जीवाणू अनेक प्रकारच्या चतुष्पाद प्राण्यांच्या मूत्राद्वारे जमिनीवर, अन्नपदार्थांवर अथवा पाण्यात मिसळले जाऊ शकतात. या चतुष्पाद प्राण्यांमध्ये उंदरांचाही समावेश होतो. लेप्टोस्पायरोसिसने बाधित असलेल्या प्राण्याचे मलमूत्र, माती, पाणी, अन्न, पेयजल आदींच्या संपका&त माणूस आल्यास जखमेद्वारे अथवा तोंडाद्वारे लेप्टोस्पायरोसिसचे जीवाणू मनुष्याच्या शरीरात प्रवेश करू शकतात. त्यामुळे उंदरांचा खात्मा करण्यासाठी पालिका विशेष मोहीम राबवते.
गेल्या तीन वर्षांची कार्यवाही

n 2020 – 1 लाख 98 हजार 451 उंदीर मारले
n 2021 – 3 लाख 23 हजार 393 उंदीर मारले
n मार्च 2022 अखेरपर्यंत – 1 लाख 11 हजार 557

n सस्तन प्राण्यांमध्ये मोडणाऱया उंदीर किंवा घुशी यांचे आयुर्मान साधारणपणे 18 महिन्यांचे असते. गर्भधारणेनंतर साधारणपणे 21 ते 22 दिवसांत मादी उंदीर पिल्लांना जन्म देते. एकावेळेस साधारणपणे 5 ते 14 पिल्लांना ती जन्म देते. जन्म दिलेली पिले 5 आठवडय़ांत प्रजननक्षम होऊन तीदेखील नव्या पिल्लांना जन्म देतात. यानुसार साधारणपणे एका वर्षात उंदराच्या एका जोडीमुळे 15 हजारांपर्यंत नवीन उंदीर तयार होऊ शकतात.

n पालिकेकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर उंदीर पकडण्याचे पिंजरे दिले जातात. घराबाहेरील उंदीर उपद्रव नियंत्रणाकरिता मूषकनाशकाच्या गोळय़ा टाकण्यात येतात. ही कामे कीटकनाशक विभागाचे कर्मचारी करतात. तर खासगी संस्थाच्या माध्यमातून रात्रीच्या वेळी उंदीर मारलेही जातात. यासाठी एका उंदरामागे पालिका 22 रुपये देते.