मुंबई महापालिका कामकाजाचे थेट प्रक्षेपण सुरू, शिवसेनेच्या मागणीला यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेच्या मागणीला यश आले असून सोमवारपासून मुंबई महापालिकेच्या ऐतिहासिक सभागृहातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिका सभागृहात आपले नगरसेवक प्रभागातील प्रश्न कशाप्रकारे मांडतात हे सर्वसामान्य मुंबईकरांना घरबसल्या पाहता येणार आहे. तसेच पालिकेतील कामकाजात पारदर्शकता ठेवण्यात मदत होणार आहे.

बृहन्मुंबई महापालिका ही जगातील सर्वात मोठी महापालिका आहे. सध्या पालिकेच्या सभागृहात चालणारे कामकाज जनतेपर्यंत थेट पोहोचवण्याची कोणतीही व्यवस्था नाही. नगरसेवक पालिकेच्या सभागृहात प्रभागातील विविध प्रश्न मांडत असतात. मुंबईतील वेगवेगळ्या विषयांवर, समस्यांवर चर्चा करतात, परंतु पालिकेचे कामकाज कशाप्रकारे चालते, लोकप्रतिनिधी आपल्या समस्या कशाप्रकारे मांडतात हे सर्वसामान्य जनतेला कळत नाही. या पार्श्वभूमीवर विधानसभा आणि लोकसभेच्या धर्तीवर पालिकेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करावे, अशी मागणी शिवसेना नगरसेविका श्रद्धा जाधव यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. अखेर या मागणीला यश आले असून सोमवारपासून मुंबई महापालिकेच्या इतिहासात प्रथमच पालिका सभागृहाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले आहे.