
क्रीडाप्रेमी आमदार सुनील राऊत यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी कमालीची रंगत पाहायला मिळाली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कबड्डीच्या रणसंग्रामासाठी उभारलेल्या भव्य क्रीडानगरीत दोन दिवसांपूर्वीच प्रभादेवीचे मैदान गाजवणाऱ्या भारत पेट्रोलियम (बीपीसीएल) आणि इन्शुअरकोट स्पोर्ट्स प्रा.लि. (आयएसपीएल)संघांनी आपला सुस्साट आणि वेगवान खेळ कायम राखत पुरुष व्यावसायिक कबड्डी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. महिलांच्या गटातही पुण्याच्या राजमाता जिजाऊ, नंदुरबारच्या धर्मवीर कबड्डी संघ आणि मुंबईच्या शिवशक्ती संघाने जोरदार खेळ करत अंतिम आठ संघांत स्थान मिळवले.
पुरुषांच्या व्यावसायिक गटात बीपीसीएलने आपला दबदबा ठोकत सुरुवातीलाच रिझर्व्ह बँकेला 36-18 असा चिरडून टाकला. मिलन दहिया आणि प्रसाद दिघोळे यांच्या चढाया-पकडींच्या वादळात प्रतिस्पर्ध्यांचा अक्षरशः निभाव लागला नाही. याच जोमावर बीपीसीएलने ठाणे महानगरपालिकेविरुद्ध 14-13 अशा थरारक एका गुणाच्या फरकाने विजय खेचत उपांत्यपूर्व फेरी गाठली. मात्र ठाणे महानगरपालिकेनेही हार मानली नाही. दुसऱ्या सामन्यात त्यांनी रिझर्व्ह बँकेचा 46-34 असा धुव्वा उडवत अंतिम आठमध्ये प्रवेश केला.
स्पर्धेतील आणखी बलाढय़ संघ असलेल्या आयएसपीएलनेही आपली ताकद दाखवत संत सोपान काका बँकेला 39-24 असा सहज पराभव करून ‘अ’ गटाचे विजेतेपद पटकावले आणि उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. मुंबई पोस्टल आणि सीजीएसटी यांच्यातील सामना तर अक्षरशः श्वास रोखून धरणारा ठरला. पोस्टलने 16-15 असा एका गुणाने विजय मिळवत पुढील फेरी गाठली.
‘क’ गटात मीरा-भायंदर महानगरपालिकेने मिडलाइन रायगडविरुद्ध 37-36 अशी थरारक लढत जिंकत बाद फेरी गाठली, तर ‘ड’ गटात युनियन बँकेने मुंबई बंदरवर 16-14 अशी मात करत आपली जागा पक्की केली.
महिलांच्या गटात तर एकतर्फी वर्चस्वाची झलक पाहायला मिळाली. पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाने दोन्ही सामने सहज जिंकत प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम केले. श्रीराम संघावर 35-10 आणि स्नेहविकास मंडळावर 40-6 अशी दणदणीत मात करत त्यांनी आपली ताकद दाखवून दिली. राजमाताच्या महेश्वरी वाघ आणि निमिता पडवळ यांच्या वेगवान खेळाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
नंदुरबारच्या धर्मवीर संघानेही डॉ. शिरोडकर क्लबला 46-24 असा सहज पराभव देत दमदार एंट्री घेतली. समृद्धी कोळेकर, हर्षदा सोनावणे, हर्षदा हंडोरे आणि ईश्वरी काेंढाळकर यांच्या अचूक चढाया आणि भक्कम पकडींनी सामना एकतर्फी केला. मुंबईच्या शिवशक्ती महिला संघाने स्वस्तिक आणि पतंगराव कदम संघाचा धुव्वा उडवत बाद फेरी गाठली, तर विवेक स्पोर्ट्स क्लबनेही संजना पोळ आणि जीवा श्रीरंगन यांच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर दोन्ही सामने जिंकत आपली छाप सोडली.
पुरुषांमध्ये बीपीसीएल, आयएसपीएल, ठाणे महानगरपालिका, मीरा-भायंदर महानगरपालिका, मुंबई बंदर आणि संत सोपान काका बँक उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. तर महिलांमध्ये राजमाता जिजाऊ, धर्मवीर, स्वराज्य स्पोर्ट्स, शिवशक्ती आणि विवेक स्पोर्ट्स क्लब यांनी दमदार मजल मारली आहे. स्पर्धेला अनेक दिग्गज खेळाडूंसह राजकीय नेत्यांचीही उपस्थिती आकर्षण ठरत आहे. भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनीही स्पर्धेला भेट देत सर्व संघांना शुभेच्छा देत त्यांना प्रोत्साहन दिले.



























































