जम्मू-कश्मीरमध्ये बसचा अपघात; 21 प्रवाशांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरमधील रामनगर-उधमपूर महामार्गावर आज बसचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातात 21 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर 29 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आले आहे. जखमींमध्ये काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

अपघातग्रस्त बस जम्मू-कश्मीरमधील दुर्गम गावातून उधमपूरच्या दिशेने निघाली होती. रामनगर भागातील काघोट गावाजवळ चालकाचे भरधाव बसवरील नियंत्रण सुटले आणि ती रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी उधमपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधान कार्यालयाने मृतांच्या नातेवाईकांसाठी प्रत्येकी 2 लाख रुपयांची, तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

जखमींना एअरलिफ्ट करून उपचारासाठी हलवण्याची व्यवस्था 

जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या घटनेवर शोक व्यक्त करत पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी उधमपूरच्या जिल्हा आयुक्तांशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला असून गंभीर जखमींना एअरलिफ्ट करून उपचारासाठी हलवण्याची व्यवस्था केली जात असल्याचे सांगितले आहे. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनीही जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाला मदतकार्यात कोणतीही कसूर न ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.