
सलग चार पराभवांमुळे रसातळाला पोहोचलेल्या मुंबई इंडियन्सच्या माथी वर्माच्या शतकाने विजय तिलक लावले. विजयाची हॅट्ट्रिक करणाऱ्या गुजरात टायटन्सचा त्यांच्या घरच्याच मैदानावर 99 धावांनी धुव्वा उडवत मुंबई इंडियन्स आयपीएलच्या रनोत्सवात जोरदार कमबॅक केले आहे.
मुंबईने या मोसमात 13 वर्षांनंतर विजयी सलामी दिली, मात्र त्यानंतर मुंबईची कामगिरी खालावत गेली आणि सलग चार सामन्यांत पराभवाची नामुष्की सहन करावी. या पराभवांमुळे मुंबईवर साखळीतच बाद होण्याचे संकट ओढावले होते. मात्र आज तिलक वर्माने मुंबईला संकटातून बाहेर काढले. आजही मुंबईच्या फलंदाजांनी निराश केले. क्विंटन डिकॉक, दानिश मालेवार, सूर्यकुमार यादव लवकर बाद झाले. मात्र तिलक वर्माने नमन धीरच्या (43) साथीने 52 आणि हार्दिक पंडय़ासह 81 धावांची भागी रचत आयपीएलमध्ये आपले पहिले वहिले शतक साजरे केले आणि मुंबईला 199 धावांपर्यंत पोहोचवले. तिलकने आपल्या 45 चेंडूंच्या खेळीत 7 षटकार आणि 8 चौकारांसह नाबाद 101 धावा चोपल्या. त्याआधी गेल्या पाचही सामन्यांत एकही विकेट टिपू न शकलेल्या जसप्रीत बुमराच्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर साई सुदर्शनला बाद केले तर हार्दिक पंडय़ाने जोस बटलरची विकेट काढली. मग शुभमन गिलने डाव सावरण्याचा प्रयत्न केला.तेव्हा अश्वमी कुमारने गिलची विकेट काढत गुजरातला हादरवले. त्यानंतर अश्वमी, मिचेल सॅण्टनर आणि अल्लाह गझनफरच्या फिरकीने गुजरातला एकामागोमाग धक्के देत त्यांचा डाव 100 धावांवरच संपवला.

























































