
घरच्या मैदानावर सलग तिसऱ्या विजयासाठी सज्ज झालेला सनरायझर्स हैदराबाद आणि अनिश्चित कामगिरीतून बाहेर पडत जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत असलेला दिल्ली पॅपिटल्स दोन्ही संघ आमनेसामने येत आहेत. दोघांच्याही खात्यात सहा गुण, पण नेट रनरेटच्या जोरावर हैदराबाद वरचढ. त्यामुळे हा सामना फक्त सामना नाही, तर पॉइंट्स टेबलवर उडी मारण्याची सुवर्णसंधी आहे. या संघर्षात हैदराबाद गड राखणार की दिल्ली त्यांचा गड जिंकणार ते उद्याच कळेल.
सनरायझर्स हैदराबाद सध्या फॉर्ममध्ये आहे, पण त्यांची कहाणी पूर्णपणे निर्दोष नाही. कर्णधार पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत गोलंदाजी सुरुवातीला कमकुवत वाटली, पण संघाने हळूहळू सावरत आपली ताकद दाखवली आहे. कमिन्स संघात परतला असला तरी या सामन्यात तो खेळण्याची शक्यता कमी आहे आणि हीच बाब हैदराबादसाठी मोठी कसोटी ठरणार आहे.
या रिकाम्या जागेतूनच काही अनोळखी चेहऱ्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. प्रफुल हिंगे, साकिब हुसेन आणि शिवांग कुमार या युवा गोलंदाजांनी संधीचं सोनं करत संघाला उभारी दिली. राजस्थानविरुद्ध हिंगेचा प्रभाव आणि चेन्नईविरुद्ध ईशान मलिंगाच्या नेतृत्वाखाली गोलंदाजांचा जबरदस्त खेळ यामुळे हैदराबादची गोलंदाजी लाईनअप आता आत्मविश्वासात आहे.

























































