
हिंदुस्थान क्रिकेट आता पारंपरिक चौकट मोडून काढायला सज्ज झालंय. एकच संघ, एकच रणनीती हा जुना फॉर्म्युला आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. कारण बीसीसीआय आता थेट ‘डबल अटॅक’ची ब्लूप्रिंट तयार करत आहे. 30-35 खेळाडूंचा भक्कम पूल आणि गरज पडली तर एकाच वेळी दोन टी 20 संघ मैदानात उतरवणार. हा निर्णय म्हणजे जागतिक क्रिकेटसाठी बीसीसीआयने स्पष्ट इशारा दिलाय की, हिंदुस्थान आता थांबणार नाही.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे वेळापत्रक इतके भरगच्च झालेय की, एकाच संघावर विसंबून चालणे आता अशक्य होत चालले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा आणि वेस्ट इंडीजविरुद्धची टी 20 मालिका एकाच काळात येण्याची शक्यता असल्यामुळे निवड समितीसमोर मोठे आव्हान उभे राहिलेय; पण बीसीसीआयने त्यावर तोडगा शोधलाय. तो म्हणजे दोन वेगवेगळे संघ, दोन फ्रंटवर लढाई.
हा फक्त तात्पुरता उपाय नाही, तर दीर्घकालीन रणनीती आहे. 2028 ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणार असल्याने मल्टी-स्पोर्ट्स इव्हेंट्समध्येही सातत्याने उतरावं लागणार आहे. म्हणजेच, ‘बेंच स्ट्रेंथ’ नव्हे, तर ‘बेंच आर्मी’ तयार करणं आता गरजेचं झालंय आणि हिंदुस्थान त्याच दिशेने वेगाने धावत आहे.
आगामी आयर्लंड दौरा हा या नव्या प्रयोगाचा पहिला कसोटीचा दगड ठरणार आहे. मोठा संघ, नवखे चेहरे आणि संधीचं सोनं करण्याची वेळ. त्यामुळे इथेच ठरेल, उद्याचे स्टार कोण आहेत ते.
सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे नेतृत्व. सध्या खराब फॉर्ममध्ये असलेला सूर्यकुमार यादव आणि दुसरीकडे आयपीएलमध्ये दमदार नेतृत्व दाखवणारा श्रेयस अय्यर या दोघांमध्ये आता थेट स्पर्धा रंगणार आहे. श्रेयस नंबर 3-4 वर स्थिरता देत नेतृत्व करू शकतो. त्यामुळे त्याला मोठी संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
आयपीएलमधून सतत नवीन चेहरे पुढे येत आहेत. त्यात यशस्वी जैसवाल, प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, अंगकृष रघुवंशी यांच्यासारखे युवा फलंदाज जोरदार दावेदारी करत आहेत. मधल्या फळीतील रजत पाटीदार आणि आयुष बदोनी, अष्टपैलू खेळाडूंमध्ये शशांक सिंह आणि अनुकूल रॉय, तर गोलंदाजीत रवि बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, कार्तिक त्यागी आणि खलील अहमद हे पर्याय तयार आहेत. विकेटकीपर म्हणून ध्रुव जुरेलही मजबूत दावेदार ठरत आहेत.
त्यामुळे आता हिंदुस्थान क्रिकेट ‘स्टार्स’वर नाही, तर ‘सिस्टम’वर चालणार आहे. दोन संघ, सतत तयार असलेला मोठा पूल आणि प्रत्येक खेळाडूला संधी. हा बदल केवळ प्रयोग नसून वर्चस्वाचा रोडमॅप आहे.

























































