
दिव्यांग व्यक्तींची रेल्वे प्रवासातील गैरसोय दूर करण्याच्या दृष्टीने रेल्वे मंत्रालयाने सोमवारी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यानुसार रेल्वे प्रवासात दिव्यांग व्यक्तींचे ‘युनिक डिसॅबिलिटी आयडी’ (यूडीआयडी) कार्ड ग्राह्य धरण्यात येणार आहे. ज्या दिव्यांगांकडे पेंद्र सरकारचे अधिपृत ‘यूडीआयडी’ कार्ड आहे, त्या प्रवाशांना मेल-एक्स्प्रेस गाडय़ांतील राखीव डब्यांतून प्रवास करण्याची मुभा असणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने दिव्यांग प्रवाशांच्या सोयीसाठी सोमवारी हा निर्णय जाहीर केला. वैध ‘यूडीआयडी’ कार्डधारक आणि सवलतीसाठी पात्र असलेल्या व्यक्तींकडे प्रवासाचे तिकीट असल्यास त्यांना दिव्यांग डब्यांमध्ये अधिपृत प्रवासी मानले जाणार आहे. दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या डब्यात सामान्य प्रवाशांनी प्रवेश केल्यास त्यांच्यावर ‘रेल्वे अधिनियम, 1989’ नुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. सर्व विभागीय रेल्वे प्रशासनांना नवीन नियमाची तत्काळ आणि प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश रेल्वे मंत्रालयाने दिले आहेत.

























































