
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विक्रोळीत आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून कबड्डीच्या या उत्सवाला आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट दिली व कबड्डीपटूंचा उत्साह वाढवला. कबड्डी हा संघभावना जपणारा खेळ आहे. कबड्डी खेळायला चपळाई पाहिजे, ताकद पाहिजे आणि नुसती कबड्डी… कबड्डी करत तंगडी पकडायची नाही तर डोकंही वापरावे लागते, असे सांगत त्यांनी या स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांचे आणि कबड्डीपटूंचे कौतुक केले.
विक्रोळी विधानसभा क्षेत्रात शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी श्रीमानयोगी प्रतिष्ठानच्या वतीने ‘आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा’ आयोजित केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाला सुवर्णपदक मिळवून देणारी शिवशक्ती महिला कबड्डी संघाची कर्णधार सोनाली शिंगटे हिने यावेळी व्यासपीठावर जाऊन उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेतले.
शिवसेनेची महानगरपालिकेत सत्ता असताना सर्वप्रथम कबड्डीचा महापौर चषक सुरू झाला आणि त्यानंतर राज्यात असे चषक सुरू झाले. शिवसेना ही कबड्डीसारख्या देशी खेळांची पाठराखण करणारा पक्ष आहे, असे यावेळी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी विक्रोळीत येऊन येथील जनतेला ऊर्जा व प्रेरणा दिली, हा संपूर्ण विक्रोळी-भांडुप परिसर भगव्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलेला आहे, असे संजय राऊत पुढे म्हणाले.
यावेळी शिवसेना उपनेते सचिन अहिर, विभागप्रमुख रमेश कोरगावकर, रश्मी पहुडकर, शाखाप्रमुख संतोष शिंदे, शाखा संघटक सुनीता तागडी, परम यादव, मुंबई उपनगर कबड्डी संघटनेचे कार्याध्यक्ष सुधाकर घाग, चंद्रशेखर जाधव, नीलेश साळुंखे आदी पदाधिकारी, शिवसैनिक, मनसेचे कार्यकर्ते आणि असंख्य नागरिक उपस्थित होते.



























































