
’नरेंद्र मोदी हे पूर्णपणे डोनाल्ड ट्रम्प यांच्या कंट्रोलमध्ये आहेत. ट्रम्प यांनी उडी मारायला सांगितली तर मोदी उडीही मारतील,’ अशी खोचक टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली.
डीएमके-काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी तामिळनाडूतील तुतितकोरीन येथे घेतलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. त्यांनी यावेळी मोदींवर पुन्हा हल्ला चढवला. ’मोदींनी ट्रम्प यांच्यापुढे शरणागती पत्करली आहे. इराण युद्ध सुरू होण्याआधी ट्रम्प यांनी मोदींना फोन केला आणि इस्रायलला जाण्यास सांगितले. मोदींनी लगेच विमान पकडले आणि इस्रायल गाठले. एपस्टिन फाइल्स आणि अदानी खटल्यामुळे मोदींना ट्रम्प यांचे ऐकावे लागत आहे,’ असा दावा राहुल यांनी केला.
नितीश कुमारांचे मुख्यमंत्रीपद कर्माने गेले!
बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावरही राहुल यांनी टीका केली. ’नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपद सोडले नाही. भाजपने त्यांना पदावरून हटवले. भूतकाळातील कृत्यांमुळे त्यांना हे पद सोडावे लागले,’ अशी टीका राहुल गांधी यांनी केली.


























































