वाढवण ग्रीन फिल्ड महामार्गासाठी 72 हजार झाडांची कत्तल होणार, 5 हजार 214 घरांवरही बुलडोझर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाढवण बंदर आणि महामार्गाला थेट जोडणाऱया ग्रीनफील्ड महामार्गासाठी पालघर आणि डहाणू तालुक्यातील 72 हजार 790 झाडांची कत्तल केली जाणार आहे. यात 244 हेक्टर भूसंपादन होणार असून 56 हजार 214 नागरिकांच्या घरांवरही बुलडोझर चालणार आहे. हा महामार्ग वाढवण ते मुंबई-अहमदाबाद मार्गावरील तवा येथे जोडला जाणार आहे. मात्र विकासाच्या नावाखाली सरकार निसर्ग भकास करत असल्याने पालघरवासियांत संताप खदखदत आहे.

खासगी की राष्ट्रीय कॉरिडॉर

2 हजार 360 कोटी रुपये खर्चून ‘वाढवण ग्रीनफिल्ड’ महामार्ग बनवण्यात येणार आहे. या महामार्गाचे काम जे.कुमार इन्फा आणि शिंदे डेव्हलपर्स कंपनीला देण्यात आले आहे. या महामार्गावरून केवळ कंटेनर आणि कार्गोची वाहतूक होणार आहे. त्यामुळे हा महामार्ग नसून तो खासगी कॉरिडॉर होणार आहे. मात्र ‘राष्ट्रीय महामार्ग’ अधिनियम अंतर्गत भूसंपादन करून कमी मोबदल्यात शेतकऱयांची बोळवण केली जात असल्याचा आरोप भुमिपुत्र संघटनांनी केला.

माहिती गुलदस्त्यात

पालघर आणि डहाणू तालुक्यातील 72 हजार 790 झाडांची बेफाम कत्तल केली जाणार आहे. तसे नोटिफिकेशनही काढण्यात आले आहे. त्यामुळे हा परिसर उघडाबोडका होऊन पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे. या कत्तलीला पर्याय म्हणून दुसऱया ठिकाणी झाडे लावण्यात येणार असल्याचे महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी सांगत असले तरी झाडे नेमकी कुठे लावणार, किती लावणार याची माहिती मात्र गुलदस्त्यात आहे.