
महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) मुंबईतील न्हावा शेवा बंदरावर टरबूजच्या बिया आणि’हिरव्या वाटाण्यांच्या तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. या कारवाईत सुमारे १३९ कोटी रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.
ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, मिळालेल्या विशिष्ट गोपनीय माहितीच्या आधारे डीआयआरच्या अधिकाऱ्यांनी १३२ कंटेनर्स अडवले. यामध्ये सुमारे ३,०२९ मेट्रिक टन माल होता. ज्यात तूर डाळ असल्याची खोटी माहिती देण्यात आली होती. मात्र सखोल तपासणी केली असता यामध्ये मोठ्या प्रमाणावर मालाची अफरातफर झाल्याचे समोर आले. या कंटेनर्समध्ये तूर डाळीऐजी टांझानिया आणि सुदानमधून आणलेल्या २,७१० मेट्रिक टन टरबूजच्या बिया आणि कॅनडामधून आणलेले ३१९ मेट्रिक टन हिरवे वाटाणे आढळले.
कमी किमतीत होणाऱ्या आयातीपासून देशांतर्गत शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी सरकारने या वस्तूंवर कडक आयात निर्बंध लादले आहेत. ५ एप्रिल २०२४ च्या डीजीएफटी (DGFT) अधिसूचनेनुसार, जून २०२४ नंतर टरबूजच्या बियांच्या आयातीवर निर्बंध किंवा बंदी घालण्यात आली आहे. तसेच १८ डिसेंबर २०१९ च्या अधिसूचनेनुसार हिरव्या वाटाण्यांच्या आयातीवरही निर्बंध असून, त्यासाठी किमान आयात किंमत (२०० रुपये प्रति किलो CIF) निश्चित करण्यात आली आहे आणि त्याची आयात केवळ कोलकाता बंदराद्वारेच करण्याची अट आहे.
या संघटित तस्करीमागील मुख्य सूत्रधार आणि आयातदार फर्मच्या मालकाला १९ एप्रिल रोजी अटक करण्यात आली आहे. देशाचे आर्थिक हित जपण्यासाठी देशांतर्गत उत्पादकांना समान संधी मिळवून देण्यासाठी आणि आयात नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी प्रतिबंधित वस्तूंच्या तस्करीविरुद्ध डीआयआरने आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे.



























































