
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड्सकडून (IRGC) हिंदुस्थानी जहाजांवर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली होती. या घटनेनंतर हिंदुस्थानी नौदल पूर्णपणे अलर्ट मोडवर आले असून आखाती क्षेत्रात उपस्थित असलेल्या सर्व व्यापारी जहाजांसाठी नवी ॲडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. ‘टीव्ही९ भारतवर्ष’ने दिलेल्या वृत्तानुसार, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नौदलाने या भागात आपल्या ७ अत्याधुनिक युद्धनौका तैनात केल्या आहेत.
नौदलाने जारी केलेल्या ॲडव्हायजरीमध्ये सांगण्यात आले आहे की, कोणत्याही हिंदुस्थानी जहाजाने लारक बेटाच्या (Larak Island) जवळ जाऊ नये. जहाजांना पर्शियन आखातातील सुरक्षित ठिकाणी थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, नौदलाचे क्लिअरन्स मिळाल्यानंतरच पुढे जाण्यास सांगण्यात आले आहे.
१८ एप्रिल २०२६ रोजी जग अर्णव आणि सन्मार हेराल्ड ही जहाजे होर्मुज पार करत असताना इराणी गार्ड्सनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. धोका वाढल्याने या दोन्ही जहाजांना आपला मार्ग बदलून तातडीने मागे फिरावे लागले. या प्रकरणाची दखल घेत परराष्ट्र मंत्रालयाने इराणच्या राजदूतांना पाचारण करून आपला निषेध नोंदवला आहे. दरम्यान, देश गरिमा हे जहाज नौदलाच्या सुरक्षा कवचात सुरक्षितपणे होर्मुज पार करून अरबी समुद्रात पोहोचले असून, ते २२ एप्रिल रोजी मुंबईत दाखल होईल.























































