
राज्यातील नऊ आयपीएस अधिकाऱ्यांच्या आज सरकारने बदल्या केल्या. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या राड्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना साताऱ्यातून सांगलीत हलवण्यात आले आहे. तर त्यांच्या जागी पुण्याचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांना साताऱ्याचे पोलीस अधीक्षक बनवण्यात आले आहे.
गृह विभागाने आज या बदल्या जाहीर केल्या. तुषार दोशी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले समजले जातात. सप्टेंबर 2023 मध्ये जालना जिह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमार प्रकरणी दोशी चर्चेत आले होते, ज्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. त्यानंतर पुणे गुन्हे शाखा, पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक अशा जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवण्यात आल्या होत्या. त्यानंतर साताऱ्याचे पोलीस अधीक्षक म्हणून ते कार्यरत होते.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीवेळी मंत्री शंभुराज देसाई आणि मकरंद पाटील यांना धक्काबुक्की झाली होती. त्याप्रकरणी तुषार दोशी यांना निलंबित करण्याचे निर्देश उपसभापती नीलम गोऱहे यांनी दिले होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलंबनाऐवजी दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. त्यानंतर आज त्यांची बदली सांगलीला करण्यात आली.
गडचिरोलीचे अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश यांना गडचिरोलीतच पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी बदलीने सोपवण्यात आली आहे. जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना पुण्यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागात पाठवण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांना धुळ्यातून जळगावला पाठवले गेले आहे. तर पुण्याचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांची बदली वाशिमच्या पोलीस अधीक्षकपदी करण्यात आली आहे.
संदीप घुगे मुंबईत
सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची मुंबईतील राज्य गुप्त वार्ता विभागात उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांच्याकडे गडचिरोलीतील पोलीस उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे, तर गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.



























































