मार्केट बंद, कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत; शिवसेनेचा सटाणा-मालेगाव रस्त्यावर रास्ता रोको

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी व संचालक मंडळ यांच्यातील वाद चिघळल्याने आज व्यापाऱ्यांनी मार्केट बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले असून संतप्त शेतकरी व शिवसेनेच्या वतीने  ‘रास्ता रोको’ आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनामुळे सुमारे दोन ते तीन तास सटाणा-मालेगाव मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.

बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर शेतकरी व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ‘रास्ता रोको’ करत निषेध नोंदविला. गेल्या दोन दिवसांपासून कांदा विक्रीसाठी माल आणून बसलेल्या शेतकऱ्यांना सोमवारी लिलाव सुरू होईल, अशी अपेक्षा होती. मात्र अचानक लिलाव बंद राहणार असल्याची घोषणा होताच शेतकरी आक्रमक झाले.

आंदोलनादरम्यान जिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, शहरप्रमुख रवींद्र सोनवणे, शेतकरी संघटनेचे देविदास अहिरे, दत्तू पवार, राजेंद्र सोनवणे, सचिन देवरे, बिंदूशेठ शर्मो आदींनी आपली भूमिका मांडली. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने अखेर व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद मागे घेत कांदा लिलाव पुन्हा सुरू केला. यावेळी सचिव भास्कर तांबे, संचालक किशोर भामरे, दिनेश गुंजाळ, डॉ. राहुल सोनवणे, रवींद्र सोनवणे यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून तोडगा काढला. या आंदोलनात माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे, प्रहारचे तुषार खैरणार, दीपक मांडवडे, सुनील चव्हाण, जिभाऊ मोरकर, किरण सोनवणे, भास्कर बागुल आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.

बागलाण तालुक्यातील गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत कांद्याला योग्य भाव मिळावा यासाठी सटाणा बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी. – लालचंद सोनवणे, शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख