
नाशिकच्या आयटी कंपनीतील ‘कॉर्पोरेट जिहाद’ चे प्रकरण ताजे असतानाच आता नागपूरमध्ये देखील महिला कर्मचाऱ्यांना धर्मांतरासाठी दबाव, लैंगिक शोषण व धार्मिक सक्ती केली जात असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. रियाज काझी असे या विकृताचे नाव असून तो ‘युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी’ स्वयंसेवी संस्थेचा संचालक आहे. त्याने त्याच्या संस्थेत काम करणाऱ्या तरुणींना नमाज, रोजाची सक्ती व इस्लामिक चालीरिती पाळण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप करत चार पीडित तरुणींनी मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हा किळसवाणा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी विकृत रियाज काझीला बेडय़ा ठोकल्या आहेत.
रियाज काझी हा गेल्या अनेक वर्षांपासून ‘युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी’, ‘फिक्र’ व ‘पढे हम, पढाये हम’ या स्वयंसेवी संस्थांमार्फत रस्त्यांवरील मुलांना शिकवतो. या उपक्रमासाठी त्याच्या स्वयंसेवी संस्थेला पुरस्कारही मिळालेला आहे. असे असतानाच या संस्थांमध्ये काम करणाऱ्या 23 वर्षीय तरुणीसह चार कर्मचारी तरुणींनी पोलीस ठाण्यात धाव घेत काझी विरोधात केबिनमध्ये बोलावून अश्लील वर्तन करत असल्याची तक्रार दाखल केली. कार्यालयातील अन्य कर्मचारी तरुणींसोबत तो अशा प्रकारचे कृत्य करत असून पुरावा नष्ट करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बंद करत असल्याचा आरोप तरुणीने केला आहे. तसेच तो धर्मांतरणासाठी दबाव टाकत असून नमाज पठण व रोजाची सक्ती करतो. चुकीच्या हेतूने स्पर्श करतो. त्याच्या जाचाला कंटाळून अनेक तरुणींनी नोकरी सोडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. हा संतापजनक प्रकार उघडकीस येताच मानकापूर पोलिसांनी रियाझ काझीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करत न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
संस्थेला टाळे ठोका
नाशिकच्या टीसीएस कंपनीतील ‘कॉर्पोरेट जिहाद’ स्वरूपाचा प्रकार उघडकीस आल्याने नागपूर हादरले आहे. या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. विश्व हिंदू परिषदेने इस्लामची सक्ती करण्याऐवजी अशा लोकांनी पाकिस्तानात जावे. अशा घटनांनी हिंदू समाज अधिक कट्टर होऊन त्यांचे गंभीर परिणाम होईल. हिंदूंची सहनशक्ती बघू नये, आता यापुढे अशा घटनांची पुनरावृत्ती करणाऱयांना चोप देऊ असा इशारा संघटनांनी दिला आहे. सरकारने विकृत काझीच्या स्वयंसेवी संस्थेवर ताबडतोब बंदी आणून त्याला कुठून निधी मिळतो, याची चौकशी करावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ नेते डॉ. हेमंत जांभेकर यांनी केली.

























































