
जंगलात वन्यजीवांच्या शिकारीसाठी दबा धरून बसलेल्या 12 शिकाऱ्यांच्या वन विभागाने मुसक्या आवळल्या आहेत. गडचिरोलीतील आलापल्ली वनपरिक्षेत्र वन विभागाने ही कारवाई केली. या शिकाऱ्यांकडून वन विभागाने दुर्मिळ वन्यजीवांचे अवशेष व शिकारीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले आहे. या 12 ही शिकाऱ्यांविरोधात वन व वन्यजीव संरक्षण अधिनियमअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आलापल्ली जंगलात काही जण शिकारीसाठी गेल्याची माहिती गेल्याची माहिती वन विभाग अधिकाऱ्यांनी मिळाली होती. त्यानुसार उपवनसंरक्षक दीपाली तळमले आणि उपविभागीय वन अधिकारी शिवपाल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी गौरव गणवीर यांच्या गस्ती पथकाने शिकाऱ्यांचा शोध घेतला. यावेळी त्यांना 12 शिकारी दबा धरून बसल्याचे सापडले. वन विभागाने त्यांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून चार शेकरू, खार, हरीनाल पक्षी आणि घुबडांच्या काही प्रजातींसह इतर वन्यजीवांचे अवशेष आणि शिकारीसाठी वापरण्यात येणारे साहित्य मिळाले. या बाराही जणांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली.


























































