
‘‘हिंदुस्थान हा कधीकाळी विश्वगुरू होता. पण आज ते स्थान राहिलेले नाही. त्यामुळे आता कुणीही हा शब्द उच्चारू नये,’’ असे स्पष्ट मत भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी यांनी आज मांडले.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून ‘विश्वगुरू’ ही संकल्पना जाणीवपूर्वक चर्चेत आणली गेली. मोदींच्या नेतृत्वात नवा भारत घडला आहे आणि तो जगाचे नेतृत्व करतो आहे, असा प्रचार सुरू झाला. मुरली मनोहर जोशी यांनी या प्रचारातील हवाच काढून टाकली. दिल्लीत ‘संस्कृत भारती’च्या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी त्यांनी यावर भाष्य केले. ‘‘विश्वगुरू होण्याची महत्त्वाकांक्षा असली पाहिजे. यात चुकीचे काही नाही. मात्र आज आपण तसे नाही हेही मान्य केले पाहिजे,’’ असे ते म्हणाले.


























































