
निसर्गाचा लहरीपणा, डोक्यावर वाढलेले कर्ज, सरकारने हमीभावाला दिलेला खो आणि सगळय़ात कहर म्हणजे सरकारचे कमालीचे दुर्लक्ष यामुळे मराठवाड्यात दररोज सरासरी तीन शेतकरी आत्महत्या करत असल्याचे धक्कादायक वास्तव सरकारच्या आकडेवारीतून समोर आले आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत 217 शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली असून छत्रपती संभाजीनगरात सर्वाधिक 53 आत्महत्या झाल्या आहेत.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, शेतमालाला हमी भाव देऊ, नैसर्गिक आपत्तीत मदत देऊ अशा टुकार घोषणा फडणवीस सरकार कायमच देत असते. परंतु सरकार पातळीवर शेतकऱयांच्या हितासाठी काहीही होत नाही, हे जळजळीत वास्तव आहे. गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीने मराठवाडय़ातील शेतकरी अक्षरशः रस्त्यावर आला. शेत वाहून गेली, संसार उघडय़ावर आले. 32 हजार कोटींचे पॅकेज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. दिवाळीला शेतकऱयांच्या खात्यावर पैसे जमा होतील असेही सांगितले गेले. मुख्यमंत्रीही गायब आणि पॅकेज गायब, शेतकरी वाऱयावर अशी सध्याची परिस्थिती आहे.
निसर्गाचा लहरीपणा, वाढते कर्ज, सरकारचे दुर्लक्ष यामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी आत्महत्येच्या वाटेवर जात आहे. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यात विभागात 217 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मागील वर्षात 1129 शेतकऱयांनी मरणाला कवटाळले. विभागीय आयुक्त कार्यालयाकडूनच ही माहिती जारी करण्यात आली आहे. आत्महत्या केलेल्या 1129 पैकी 796 शेतकरी मदतीस पात्र ठरवून त्यांच्या वारसदारांना मदत देण्यात आली आहे. 140 आत्महत्यांची प्रकरणे मदतीस अपात्र ठरली असून, 193 प्रकरणे चौकशीत प्रलंबित आहेत.
तीन महिन्यांतील आत्महत्या
- छत्रपती संभाजीनगर 53
- जालना 13
- हिंगोली 13
- परभणी 19
- नांदेड 29
- बीड 49
- लातूर 11
- धाराशीव 30

























































