
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी उद्घाटन होत असलेल्या राजस्थानमधील बालोत्रा येथील पाचपद्रा रिफायनरीला आज अचानक आग लागली. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाने तत्काळ हालचाली करून येथील कर्मचाऱयांना सुरक्षित बाहेर काढले.
हिंदुस्थान पेट्रोलियम
कॉर्पोरेशन लिमिटेडची ही रिफायनरी आहे. यातील कच्च्या तेलावर प्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात आलेल्या युनिटमध्ये दुपारी दोनच्या सुमारास ही आग लागली. अचानक लागलेल्या या आगीमुळे एकच गोंधळ उडाला. अवघ्या काही क्षणात धुराचे लोट हवेत उसळले. खबरदारीचा उपाय म्हणून आसपासचा परिसर रिकामा करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे डझनभर बंब घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी रिफायनरीतील कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. त्यानंतर आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. अशोक गेहलोत यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी 2013 साली पाचपद्रा रिफायनरीचे भूमिपूजन केले होते.































































