
काँग्रेसने महिला आरक्षण विधेयक मंजूर होऊ न दिल्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रवेशद्वारावर महायुतीने सोमवारी आंदोलन केले. या आंदोलनात महापौर रवि लांडगे यांच्यासह भाजपच्या पदाधिकारी आणि नगरसेवकांनी ‘या सरकारचे करायचे काय, खाली डोक वर पाय’ अशा स्वतःच्याच सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची एप्रिल महिन्याची सर्वसाधारण सभा सोमवारी आयोजित केली होती. महापौर रवि लांडगे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. या सभेत इंडिया आघाडीच्या विरोधात महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटाच्या नगरसेविकांनी भाषणे करून सभा तहकूब केली.
सभा तहकूब केल्यानंतर महापालिकेच्या प्रवेशद्वारावर महायुतीच्या सर्व नगरसेवकांनी आंदोलन केले. यावेळी सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी ‘या सरकारचे करायचे काय,’ अशी घोषणा देताच, महापौर रवि लांडगे, आमदार उमा खापरे यांच्यासह नगरसेविकांनी ‘खाली डोके वर पाय,’ अशा स्वतःच्याच सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच स्वतःच्याच सरकारविरोधात घोषणाबाजी दिल्याचे लक्षात येताच, शितोळे यांनी पुन्हा इंडिया आघाडीचे करायचे काय,’ अशी घोषणा दिली. पक्षनेते शितोळे चुकीची घोषणाबाजी करत असल्याचे लक्षात येताच, आमदार खापरे यांच्यासह नगरसेविकांनी आंदोलनातून काढता पाय घेतला. स्वतःच्याच सरकारचा निषेध केल्यासारखा हा प्रकार घडल्याने सोशल मीडियावरही या घटनेची जोरदार चर्चा रंगली. त्यामुळे महायुतीच्या आंदोलनाचे पुरते हासे झाल्याचे दिसून आले.































































