
म्हाडाच्या माध्यमातून मार्गी लावण्यात येत असलेला गोरेगाव मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प वादात सापडला आहे. प्रकल्पाच्या सार्वजनिक बैठकीत 2400 चौरस फुटांच्या घरासाठी आग्रह धरणाऱ्या रहिवाशांना, तुम्हाला प्रकल्प नको असेल तर सांगा, तुमच्या घरांचं हस्तांतरण कसं होतं ते मो बघतो, अशा शब्दांत म्हाडा सीईओ संजीव जयस्वाल यांनी रहिवाशांना धमकावले. जयस्वाल एवढय़ावरच थांबले नाहीत, तर बैठकीत प्रश्न विचारणाऱ्या रहिवाशांना थेट घुसखोर ठरवत कारवाईचा इशारा दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जयस्वाल यांच्या अरेरावीविरुद्ध स्थानिक रहिवाशांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
म्हाडाच्या माध्यमातून मोतीलाल नगरचा पुनर्विकास करण्यात येत असून या प्रकल्पाचे पंत्राट अदानी समूहाला देण्यात आले आहे. शुक्रवारी सायंकाळी रहिवाशांपुढे या पुनर्विकास प्रकल्पाच्या आराखडय़ाचे सादरीकरण मोतीलाल नगर येथील गणेश मैदान येथे आयोजित बैठकीत करण्यात आले. मोतीलाल नगरवासीयांची 2400 चौ. फुटांच्या (कार्पेट) घराची मागणी आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत 1600 चौरस फुटाचे घर देऊन प्रकल्प मार्गी लावण्याचा घाट घातला जात असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र असंतोष आहे. शुक्रवारी म्हाडा सीईओ जयस्वाल यांच्यासमोरच 2400 चौरस फुटांच्या मागणीचे फलक झळकवण्यात आले. यामुळे अस्वस्थ झालेल्या जयस्वाल यांनी आवाज चढवत, रहिवाशांना धमकावले. तसेच फलक दाखवणाऱया एका दाढीवाल्या तरुणाकडे पाहून तू घुसखोर आहेस का? तुझे आयकार्ड दाखव. तू घुसखोर असशील तर तुला येथूनच उचलेन, असे धमकावले. एवढेच नाही तर जयस्वाल यांनी संबंधित तरुणाला पोलिसांना ताब्यात घ्यायला सांगितले.
तुम्हाला नको ना पुनर्विकास, मी प्रकल्प थांबवतो
तुम्हाला नको ना पुनर्विकास, मी प्रकल्प थांबवतो, गौतम अदानीला तसं सांगतो, असे जयस्वाल म्हणाले. माझ्यासोबत बैठकीचे इतिवृत्त तुम्ही परस्पर जाहीर करता, तुमच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल करेन. येथे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. त्याचे उद्यापासूनच सर्वेक्षण सुरू करेन. किती अनिवासी क्षेत्र किती वाढवले हे पाहायला लावू नका. माझ्या संयमाचा अंत पाहू नका. तुमच्या घराचे हस्तांतरण कसे होते ते मी पाहतो. तुम्ही भाड्याने दिलेली घरे भाडोत्रीच्या नावावर करतो अशा धमक्या जयस्वाल यांनी दिल्या.































































