बंगाली, तमिळींसारखाच महाराष्ट्रात मराठी माणूस मराठी म्हणून एकवटेल – उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बंगालमध्ये बंगाली एकवटले आहेत. तामीळनाडूत तमीळ एकवटले आहेत, तसाच महाराष्ट्रातसुद्धा मराठी माणूस मराठी म्हणून एकवटल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विक्रोळी विधानसभा क्षेत्रात शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी श्रीमानयोगी प्रतिष्ठानच्या वतीने ‘आमदार चषक 2026 राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा’ आयोजित केली आहे. कबड्डीच्या या उत्सवाला आज उद्धव ठाकरे यांनी भेट दिली यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत शिवसेना नेते-खासदार संजय राऊत हेसुद्धा उपस्थित होते.

विक्रोळी-भांडुपने मराठी आणि भगवा ठसा कायम ठेवला

विक्रोळी, भांडुप या भागाने मराठी आणि भगवा ठसा कायम ठेवला आहे, असे प्रशंसोद्गार काढतानाच उद्धव ठाकरे यांनी यावेळी सर्व कबड्डी संघांना शुभेच्छा दिल्या. मैदानी खेळांची ही परंपरा पुढेही चालू ठेवा. कारण हळूहळू मैदानेही कमी होत चालली आहेत, ती शिवसेना वाचवणार नाही तर कोण वाचवणार, असे आवाहनही यावेळी उद्धव ठाकरे यांनी आमदार सुनील राऊत यांना केले.

खरी आयपीएल या कबड्डीच्या मैदानात आहे. जल्लोष आणि जोशही तसाच आहे. फरक इतकाच की आयपीएलमध्ये कोणता खेळाडू कोणत्या संघात आहे ते कळत नाही. कारण तिकडेही बोली लागते आणि हल्ली राजकारणातही बोली लागू लागली आहे. ज्याची बोली जास्त, तिकडे सगळे जातात. पण कबड्डीत तसे नाही. कबड्डीत एक संघभावना आहे. येथे डोपं वापरून तंगडय़ा पकडतात आणि आम्ही राजकारणात फक्त तंगडय़ात तंगडय़ा घालण्याचे काम करतो.