
हिंदुस्थानसाठी पहिले ऑलिम्पिक पदक घेऊन येणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. याची दखल घेत यावर 4 मेपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत.
न्या. माधव जामदार व न्या. प्रवीण पाटील यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करत पहिले ऑलिम्पिक पदक पटकावले. त्यामुळे त्यांना या सर्वोच्च मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घ्यायला हवा, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले.
कुस्तीवीर खाशाबा जाधव फाऊंडेशनने ही जनहित याचिका दाखल केली आहे. खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित करावे यासाठी केंद्र सरकारकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र केंद्र सरकारकडून सकारात्मक उत्तर मिळाले नाही. तेव्हा आता न्यायालयाने याबाबत आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
पहिले कांस्य पदक
1952 च्या ऑलिम्पिक मध्ये खाशाबा जाधव यांनी कुस्तीत कांस्य पदक पटकावले. हिंदुस्थानसाठी हे पदक आहे. 1984 मध्ये खाशाबा जाधव यांचे निधन झाले. 2001 मध्ये मरणोत्तर अर्जुन पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला.



























































