
स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या इच्छेनुसार आज त्यांच्या अस्थींचे पवित्र गंगेत विसर्जन करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर नवव्या दिवशी हा विधी वाराणसी येथे झाला.
सोमवारी सकाळी वाराणसीतील नमो घाट येथून अत्यंत भावपूर्ण वातावरणात अस्थिकलश मणिकर्णिका घाटापर्यंत नेण्यात आला. फुलांनी सजवलेल्या बोटीत आशाताईंचे छायाचित्र ठेवण्यात आले होते, तर पार्श्वभूमीला त्यांच्या अमर गाण्यांचे मंद स्वर वातावरण भारून टाकत होते. मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींच्या साक्षीने ही बोट हळूहळू मणिकर्णिका घाटाकडे रवाना झाली. यादरम्यान एनडीआरएफच्या जवानांनी जलमार्गावर मानवंदना दिली. घाटावर पोहोचल्यानंतर त्यांचे चिरंजीव आनंद भोसले यांनी विधिवत अस्थी विसर्जन केले. यावेळी त्यांची पत्नी अनुजा भोसले आणि मुलगी जनाई उपस्थित होत्या. तसेच राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशीष शेलार, योगेश खडीकर, स्थानिक आमदार अवध्येश सिंह यांच्यासह ‘जीवनगाणी’ मित्रपरिवारातील सदस्यही उपस्थित होते.





























































