
मुंबईला पडलेला अमली पदार्थांचा विळखा सोडवण्यासाठी आणि युवा पिढीमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी 1 मे महाराष्ट्र दिनापासून नशामुक्त मुंबईसाठी ‘मुंबई अगेन्स्ट ड्रग्ज’ मोहीम राबवण्यात येणार आहे.
मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित एका म्युझिक कॉन्सर्टदरम्यान अमली पदार्थांच्या (ड्रग्ज) अतिसेवनामुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने वांद्रे येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अमित साटम यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
यासंदर्भात एक कमिटी स्थापन करण्यात येणार आहे. नशामुक्ती क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या कमिटीचे अध्यक्ष नियुक्त करण्यात येतील. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन 1 मे 2026 ते 1 मे 2027 या कालावधीत मुंबई अगेन्स्ट ड्रग्ज’ ही मोहीम वर्षभर राबवणार असल्याचे मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.
महापालिकेचे विद्यमान वॉर्ड अध्यक्ष या कमिटीचे उपाध्यक्ष असतील. सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी, स्थानिक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी, मानसोपचार तज्ञ, शिक्षण अधिकारी अशा 12 सदस्यांची कमिटी असेल. त्याचबरोबर स्थानिक संसद सदस्य, आमदार, नगरसेवक हे लोकप्रतिनिधी या कमिटीचे विशेष निमंत्रित सदस्य असतील.



























































