आणीबाणी रोखण्यासाठी पालिका ‘मिशन मोड’वर, मुंबईला मिळणार जादा 500 टन ऑक्सिजन

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजन कमी होणाऱया रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. असे असताना काही रुग्णालयात पुरेसा साठा नसल्याने रुग्णांना ऑक्सिजन असलेल्या रुग्णालयात हलवावे लागत आहे. मात्र दररोज 235 मेट्रिक टन गरज असणाऱया पालिकेला आता विशाखापट्टणम, जामनगर आणि रायगड या तिन्ही ठिकाणांहून मिळून दररोज सुमारे 500 टन वाढीव प्राणवायू मिळणार आहे. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी ही माहिती दिली. वेळेत प्राणवायू पुरवठा करण्यासाठी आणि पुरवठय़ावर नजर ठेवण्यासाठी ‘गुगल ड्राइव्ह’चा वापर केला जाणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

पालिकेच्या 6 रुग्णालयांतील 168 रुग्णांना 17 एप्रिल रोजी प्राणवायू उपलब्ध असलेली पालिका रुग्णालये आणि समर्पित कोरोना आरोग्य केंद्रांमध्ये सुरक्षितरीत्या स्थलांतरीत करण्यात आले. या पार्श्वभूमीवर प्राणवायू पुरवठय़ासंदर्भात प्रणालीमध्ये अधिक सुसूत्रता व समन्वय साधण्यासाठी आयुक्त चहल यांनी आज ऑनलाइन बैठकीत आढावा घेऊन आवश्यक सूचना दिल्या. 168 रुग्णांना सुरक्षितरीत्या हलवल्याच्या कामगिरीबद्दल आयुक्तांनी पालिकेच्या आरोग्य प्रशासनासह सर्व संबंधित यंत्रणेचे कौतुक-अभिनंदन केले. हा प्रसंग सांगताना आयुक्त चहल भावनाविवश झाले. बैठकीत सहभागी झालेल्या प्राणवायू उत्पादक व पुरवठादार यांच्या समस्या आणि मागण्या जाणून घेतल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, संजीव जयस्वाल, पी. वेलरासू, सुरेश काकाणी, अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांच्यासह प्राणवायू उत्पादक तसेच पुरवठादार या बैठकीत सहभागी झाले होते.

वितरणावर पालिकेच्या पथकांची नजर

प्राणवायूची मागणी वाढल्याने अन्न व औषध प्रशासनासह प्राणवायू उत्पादक व पुरवठादार यांच्यावर ताण वाढला आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत मुंबईसाठी सध्या प्रतिदिन देण्यात येत असलेला 235 मेट्रिक टन प्राणवायू साठा कमी करण्यात येऊ नये यासाठी प्राणवायू उत्पादन स्थळापासून त्याची वाहतूक आणि मुंबईतील सर्व कोरोना रुग्णालये व कोरोना केंद्र व इतर रुग्णालयांमध्येदेखील त्याचे वितरण होईपर्यंतच्या सर्व बाबींवर देखरेख करण्यासाठी पालिकेची पथके नेमण्यात येतील.

ही पथके रुग्णालयांना दररोज प्राप्त झालेला प्राणवायू साठा किती त्याची माहिती गुगल ड्राइव्हमध्ये अद्ययावत करतील. त्यामुळे दररोज किती प्राणवायू मुंबईतील रुग्णालयांमध्ये उपलब्ध होतो, त्यावर देखरेख करता येईल, अशी सूचना चहल यांनी केली. खासगी रुग्णालयांना उपलब्ध ऑक्सिजन साठय़ाचा सुयोग्य आणि काटकसरीने वापर करण्याच्या सक्त सूचना करण्यात आल्या.

आपली प्रतिक्रिया द्या