महापालिकेच्या ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षणाला भरघोस प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bmc-2

कोरोनाच्या काळातही मुंबई महापालिकेच्या ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षणाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. कांदिवलीतील मुंबई मराठी पब्लिक स्कूलच्या शिक्षकांनी स्वतः विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेत पालकांशी संवाद साधला. शिक्षणाबरोबर 50 हजारापर्यंतच्या जीवनावश्यक साहित्याचे वाटपही शिक्षकांनी केले. या कार्याची दखल विधान परिषद (एससीईआरटी), पुणे यांनी ‘ऑनलाईन शिक्षण विकास मंच-जिल्हा इन फोकस’ या उपक्रमात घेऊन शाळेच्या उल्लेखनीय कार्याची प्रशंसा केली.

कोरोनाच्या काळात प्रत्यक्ष ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घेणाऱया विद्यार्थ्यांबरोबरच ऑफलाईन शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून बालकमित्र, पालकमित्र आणि शिक्षकमित्र ही संकल्पना राबवली जात आहे. आर/दक्षिण विभागात येणाऱया कांदिवली येथील मुंबई मराठी पब्लिक स्कूलचे पालकमित्र सुनील खरात यांच्यासह शाळा निरीक्षक गोविंद पारधी, मुख्याध्यापिका प्रतिभा ढोले यांनी शाळेतील प्रशिक्षिका अनुजा चव्हाण, कासले, कापुरे यांच्यासह ऑफलाईन शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. या वेळी विद्यार्थ्यांबरोबर पालकांशी संवाद साधला. ऑनलाईन शिक्षणासाठी इयत्ता आठवीच्या वर्गाला ‘नवनीत प्रकाशन’ने 28 विद्यार्थ्यांना मोफत टॉप स्कोअर ऍप उपलब्ध करून दिले. प्रशिक्षिका अनुजा चव्हाण या 8 आणि 9 वीच्या विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय ऑनलाईन करतात. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. लॉकडाऊनच्या काळात शाळेतील सर्व शिक्षकांनी 50 हजार रुपयांपर्यंतचे जीवनावश्यक साहित्य विद्यार्थ्यांना वितरित केले आणि पटसंख्या टिकवून ठेवण्यात अथक प्रयत्न केले. या वेळी पालिका शिक्षण अधिकारी महेश पालकर यांच्यासह पश्चिम उपनगरच्या उपशिक्षण अधिकारी सुजाता खरे, अधीक्षक अशोक मिश्रा, प्रशासकीय अधिकारी कल्पना संखे यांनी शिक्षक, शाळेला बहुमोल मार्गदर्शन केले.