आपत्कालीन परिस्थितीत 7 शाळांमध्ये 10 हजार भीम अनुयायांसाठी निवारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

हिंदुस्थानच्या घटनेचे शिल्पकार, महामानव ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 62व्या महापरिनिर्वाणदिनी अभिवादनासाठी मुंबईत येणाऱया लाखो अनुयायांकरिता पालिकेने सेवा-सुविधा सुसज्ज ठेवल्या आहेत. यामध्ये आपत्कालीन स्थितीमध्ये दहा हजार अनुयायांच्या तात्पुरत्या निवासासाठी शिवाजी पार्क परिसरातील पालिकेच्या सात शाळा निश्चित करण्यात आल्या असून पिण्याचे पाणी, शौचालये, वैद्यकीय कक्ष, आगप्रतिबंधक अशा सर्व सेवा-सुविधा तैनात केल्या आहेत.

दादर चैत्यभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी येतात. या अनुयायांच्या सोयीसाठी पालिकेने केलेल्या सोयी-सुविधांची माहिती उपायुक्त नरेंद्र बरडे यांनी दिली. चैत्यभूमी परिसर, शिवाजी पार्क परिसर, दादर रेल्वे स्थानक, राजगृह (हिंदू कॉलनी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय (वडाळा) व लोकमान्य टिळक (कुर्ला) टर्मिनस येथे आवश्यक त्या सर्व नागरी सेवा-सुविधा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त पालिकेच्या जनसंपर्क विभागाकडून डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सचित्र माहिती पुस्तिकेचे प्रकाशन महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत 5 डिसेंबर रोजी शिवाजी पार्क येथे सकाळी 10 वाजता होणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे या माहिती पुस्तिकेच्या एक लाख प्रतींचे विनामूल्य वितरण चैत्यभूमी येथे करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने केलेल्या सेवा-सुविधांचा लाभ अनुयायांनी घ्यावा, असे आवाहन महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर, आयुक्त अजोय मेहता यांनी केले आहे.

अशा केल्या सुविधा
 चैत्यभूमी व शिवाजी पार्क येथे शामियाना व व्हीआयपी कक्षासह नियंत्रण कक्षाची व्यवस्था.
 चैत्यभूमी प्रवेशद्वाराजवळ व सूर्यवंशी सभागृह मार्ग या 3 ठिकाणी रुग्णवाहिकेसह आरोग्य सेवा.
 1 लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्या मंडपात तात्पुरती व्यवस्था.
 शिवाजी पार्क मैदान व परिसरात 18 फिरती शौचालये.
 रांगेत असणाऱ्या अनुयायांसाठी चार फिरती शौचालये.
 पिण्याच्या पाण्याचे 16 टँक्स, 380 पिण्याच्या पाण्याच्या नळांची व्यवस्था.
 संपूर्ण परिसरात विद्युत आणि अग्निशमन यंत्रणा सज्ज.
 चौपाटीच्या संपूर्ण परिसरात सुरक्षारक्षकांसह बोटी तैनात.
 मोठय़ा पडद्यावर थेट प्रक्षेपण, 496 स्टॉल्सची रचना.

स्वामिनारायण मंदिराजवळ नियंत्रण कक्ष
-दादरमध्ये येणाऱया अनुयायांच्या माहितीसाठी दादर पूर्व स्वामिनारायण मंदिराजवळ नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहे. शिवाय राजगृह येथे नियंत्रण कक्ष आणि वैद्यकीय कक्षही उभारण्यात येणार आहेत.

– स्काऊट गाइड हॉल येथे भिक्कू निवासाची व्यवस्था करण्यात आली आली आहे, तर अनुयायांच्या मार्गदर्शनाकरिता चैत्यभूमीवर 100 फूट उंचीवर निदर्शक व्यवस्था करण्यात येणार आहे. मोबाइल चार्जिंगसाठी 300 पॉइंटची व्यवस्था करण्यात आली आहे.