
सामना प्रतिनिधी । मुंबई
अर्थसंकल्पातील निधी वापरला जात नाही अशी टीका नेहमी पालिकेवर होत असली तरी यंदा विकासकामांवरील खर्च 18.48 टक्क्यांनी वाढला आहे. डिसेंबरअखेरीस अर्थसंकल्पातील 37 टक्के निधी भांडवली कामांवर खर्च झाला आहे. अर्थसंकल्पाचे आकारमान कमी करून दोन वर्षांपूर्वी महापालिकेने वास्तववादी अर्थसंकल्प मांडून एक नवीनच आदर्श घालून दिला होता. या अर्थसंकल्पातील जास्तीत जास्त निधीचा वापर करून पालिकेने नवीन पायंडा पाडला आहे.
सन 2018-19 या आर्थिक वर्षासाठी पालिकेने 25, 141 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. आर्थिक वर्ष 2018 च्या शेवटी म्हणजेच 31 डिसेंबर 2018 रोजी महापालिकेच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकातील भांडवली खर्च तरतुदींपैकी 37.74 टक्के रकमेचा विनियोग झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात 18.47 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरअखेरीस 31 टक्के निधीच खर्च झाला होता. या आर्थिक वर्षात प्रत्यक्ष काम सुरू झालेल्या किनारी रस्ता प्रकल्पावर 31 डिसेंबरपर्यंत तरतुदीच्या 15.27 टक्के रक्कम खर्च झाली आहे.
वास्तवदर्शी अर्थसंकल्प मांडण्याचे निर्देश महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिल्यानंतर गेल्या वर्षी पालिका प्रशासनाने रिऍलिस्टिक बजेट आणले. मुंबईत सध्या रस्ते, पर्जन्यजल वाहिन्या, पाणीपुरवठा व मलनिःसारण, विकास नियोजन, सार्वजनिक आरोग्य, प्रमुख रुग्णालये, उद्याने, मंडई यासारखी विविध लोकापयोगी कामे प्रगतिपथावर असल्याने चालू आर्थिक वर्षात भांडवली कामांसाठी तरतूद असलेल्या रकमेच्या विनियोग टक्केवारीत वाढ होण्याची अपेक्षा आहे.
आर्थिक वर्ष 2018 – 19 च्या अंदाजपत्रकानुसार
भांडवली खर्चासाठी तरतूद – 9 हजार 547 कोटी
खर्च – 3 हजार 508 कोटी (36.74 टक्के)


























































