प्रदूषणकारी बेकऱ्या नोटीस दिल्याशिवाय बंद करणार; हवेची गुणवत्ता राखण्यासाठी पालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील हवेचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने कठोर पावले उचलायला सुरुवात केली असून आता प्रदूषणकारी बेकऱ्या नोटीस न देता थेट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत मुंबईत सुमारे 85 ते 87 टक्के बेकऱ्यांनी पर्यावरणपूरक इंधन वापरायला सुरुवात केली असली तरी अजूनही शेकडो बेकऱ्या बेकायदेशीरपणे लाकूड, प्लायवूड असे प्रदूषणकारी इंधन वापरून सुरू आहेत. या बेकऱ्या आता तातडीने बंद करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांनी आज दिली.

मुंबईत दररोज हजारो बेकऱ्या सुरू असतात. मात्र यातील अनेक बेकर्यांमध्ये इंधनासाठी जळल्यानंतर विषारी वायू हवेत सोडणारे जुनाट लाकूड, प्लायवूड आणि प्लॅस्टिकसारख्या वस्तूही वापरल्या जातात. या जळणातून मोठय़ा प्रमाणात विषारी द्रव्ये हवेत सोडली जातात. त्यामुळे पालिकेने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्व बेकऱ्यांना नोटिसा बजावून आपली इंधन प्रक्रिया सीएनजी, पीएनजी, एलपीजी किंवा इलेक्ट्रिक करण्याचे निर्देश दिले होते. या नोटिसांनुसार  592 बेकऱ्यांचे सर्वेक्षणही करण्यात आले. यातील शेकडो बेकऱ्यांनी इंधन प्रक्रिया पर्यावरणपूरक केली नसल्याने त्यांना अंतिम नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसची मुदत आता संपली असल्याने नोटीस न देता या बेकऱ्या थेट बंद करण्याची कारवाई पालिकेकडून केली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिली.

मुंबईत 3368 सेन्सर्सवर वॉच

मुंबईतील हवेच्या गुणवत्तेवर नजर ठेवण्यासाठी विविध ठिकाणी सुमारे 3368 सेन्सर्स बसवण्यात आले असल्याची माहितीही ढाकणे यांनी दिली. या सेन्सर्सच्या माध्यमातून मिळणाऱ्या आकडेवारीवर पालिकेचा नियमित वॉच असून त्यानुसार आवश्यक खबरदारीच्या योजनाही केल्या.

रस्ते धुण्यासाठी पर्यायी पाण्याचा वापर

धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी सक्शन मशीनचा वापर आणि रस्ते धुणे असे पर्याय वापरले जाणार आहेत. रस्ते धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरण्यात येणार नसून बोअरवेल, हायड्रंट, एसटीपी प्रकल्पातील पाणी वापरण्यात येणार असल्याचेही पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी फटाकेबंदी

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवण्यास बंदीच राहणार असून याबाबत पालिकेच्या जनजागृती केली जाणार आहे. यासाठी तातडीने जाहिरात प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडू नयेत यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने फटाके टाळावेत, असे आवाहनही पालिकेकडून करण्यात आले आहे.