
सामना प्रतिनिधी, मुंबई
पालिकेच्या विविध समित्यांमध्ये नगरसेवक नागरी समस्यांशी संबंधित प्रश्नांवर हरकतीचा मुद्दा उपस्थित करतात. नगरसेवकांनी दिलेली माहिती कितीही खरी असली तरी मुद्दय़ावर निर्णय देताना ‘सत्य आहे पण तथ्य नाही’ असे रुलिंग देण्याची पालिकेची प्रथा परंपरा आहे, मात्र यापुढे नगरसेवकांच्या कोणत्याही मुद्दय़ात तथ्य नाही असे म्हटले जाणार नाही. शिवसेनेचे नगरसेवक राजू पेडणेकर यांनी पालिकेच्या या नियमावरच आक्षेप घेतल्यामुळे अखेर ही पद्धत बदलण्याचे चिटणीस विभागाने मान्य केले आहे.
पालिकेच्या विविध समित्या, प्रभाग समित्यांमध्ये नगरसेवक आपापल्या विभागातील विविध समस्या मांडत असतात. त्यापैकी काही मुद्दे हे प्रशासनाने उत्तर द्यावे म्हणून राखून ठेवले जातात. पालिकेचे कामकाज चालवण्याच्या नियमावलीनुसार काही मुद्दे निकाली काढताना ‘सत्य असले तरी तथ्य नाही’ असे रुलिंग अध्यक्षांना द्यावे लागते. नगरसेवकांनी मांडलेली समस्या खरी असली आणि त्यावर कारवाई झालेली असली तरी त्यात ‘तथ्य नाही’ असे म्हटले जाते. शब्दांचा हा खेळ असला तरी त्यात नगरसेवकांचा आणि त्यांच्या हेतूचा अवमान होत असतो. त्यामुळे ही पद्धत बदलावी अशी मागणी शिवसेनेचे राजू पेडणेकर यांनी केली होती.
ग्राह्य किंवा अग्राह्य
पालिकेच्या कामकाजातील या पद्धतीलाच विशेषतः ‘तथ्य नाही’ या शब्दाला नगरसेवक राजू पेडणेकर यांनी हरकत घेतली होती. त्यांच्या हरकतीची चिटणीस विभागाने दखल घेतली आहे. यापुढे समित्यांमध्ये असे रुलिंग दिले जाणार नाही, असे लेखी आश्वासनही चिटणीस विभागाने दिले आहे. यापुढे हरकतीच्या मुद्दय़ांवर रुलिंग देताना मुद्दा ग्राह्य धरला, मुद्दा राखून ठेवला असे म्हटले जाणार आहे. माहिती चुकीची असल्यास मुद्दा अग्राह्य असे रुलिंग दिले जाणार असल्याचे चिटणीस विभागाने स्पष्ट केले आहे.































































