गर्लफ्रेंड 16 अन लक्झरी गाड्यांवर डोळा; प्रेयसींना मिरवण्यासाठी BMW, मर्सिडीजसह 50 कार चोरणाऱ्याला बेड्या

हरयाणा पोलिसांनी 16 गर्लफ्रेंड असणाऱ्या एका चोराला अटक केली आहे. प्रेयसींचे शौक पूर्ण करण्यासाठी हा चोर लक्झरी गाड्याची चोरी करायचा. या बहाद्दराने वेगवेगळ्या राज्यातून बीएमडब्ल्यू, मर्सिडीज यासह तब्बल 50 कारची चोरी केल्याचे समोर आले आहे. मूळचा हिसार येथील रहिवासी असणाऱ्या या चोराच्या फरिदाबाद क्राईम ब्रँच (सेक्टर 30) पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अटक केलेल्या आरोपीचे नाव रॉबिन उर्फ राहुल उर्फ हेमंत उर्फ जॉनी (रा. जवाहर नगर, हिसार, हरयाणा) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रॉबिन वेषांतर करून पोलिसांना गुंगारा देत होता. प्रत्येक वेळी तो वेषांतर करून गाड्यांची चोरी करायचा. तसेच पकडल्यावर दर वेळेस तो वेगवेगळा पत्ता सांगायचा. त्याने हिसारमध्ये अनेक महागड्या गाड्यांची चोरी केली आणि पकडल्यावर 15 ते 20 वेळा वेगवेगळा पत्ता पोलिसांना सांगितला. विशेष म्हणजे तो मूळचा हिसारमधील असला तरी त्याचा ठिकाणा मात्र विविध राज्यात असायचा.

आरोपी फक्त लक्झरी गाड्यांवर हात साफ करायचा. हिसारसह एनसीआर आणि देशातील अनेक भागात लक्झरी गाड्याची चोरी केली आहे. आरोपीला 16 गर्लफ्रेंड असून त्यांचे शौक पूर्ण करण्यासाठी तो गाड्यांची चोरी करायचा असा दावा देखील पोलिसांनी केला आहे.

दरम्यान, आरोपीला याआधी देखील अटक करण्यात आलेली आहे. दिल्ली पोलिसांनी त्याला 1 वर्षांपूर्वी अटक केली होती. नुकताच तो तुरुंगातून शिक्षा भोगून बाहेर आला होता आणि पुन्हा चोरीचा धंदा सुरू केला. 31 ऑगस्टला सेक्टर 28 मध्ये घराबाहेर उभी असणारी फॉर्च्‍यूनर कार त्याने लांबवली होती. क्राईम ब्रँचने अटक केल्यानंतर आरोपीने जोधपूर येथून फॉर्च्‍यूनर आणि गुरुग्राम येथून जीप चोरी केल्याचे कबूल केले.

आपली प्रतिक्रिया द्या