लोकल प्रवाशांकडून 35 बनावट ओळखपत्र जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मिशन ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत काल रात्रीपासून मुंबईसह राज्यभर लागू झालेल्या लॉकडाऊनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांनाच उपनगरी लोकलमधून प्रवासाची परवानगी दिलेली आहे. परंतु तरीही काही अनधिकृत प्रवाशांनी लोकलमधून प्रवास करण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्यावर मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या आरपीएफ व जीआरपी पोलिसांनी कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे. मध्य रेल्वेने अत्यावश्यक कर्मचारी असल्याचा बनाव करणाऱया 35 प्रवाशांवर कारवाई करून त्यांची ओळखपत्रे जप्त केली आहेत.

राज्यात गुरुवार 22 एप्रिलच्या रात्री 8 वाजल्यापासून ते 1 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे लोकल सेवा पुन्हा सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. मध्य रेल्वेने बनावट ओळखपत्र वापरून प्रवास करणाऱया 35 जणांवर कारवाई करीत त्यांची बनावट ओळखपत्र जप्त केली आहेत. पश्चिम रेल्वेने आज विविध स्थानकांवर 135 टीसींची नेमणूक केली होती. पश्चिम रेल्वेने मास्क परिधान न करणाऱया 80 जणांवर कारवाई करीत 1200 रुपयांचा दंड वसूल केला आहे.