आयटीआय बोर्डाचे बोगस प्रमाणपत्र देणारे दोघे गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बदनापूर

कोणत्याही तांत्रिक अभ्यासक्रमाचे (ट्रेड) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून शिक्षण न घेता थेट राज्य शासनाच्या तंत्रशिक्षण परिषदेचे (बोर्डाचे) बनावट प्रमाण पत्र तयार करून विकण्याचा गोरखधंदा करणाऱ्या धोपटेश्वर येथील दोघांना पोलिसांनी अटक केली असून बदनापूर येथील एका फोटो स्टुडिओमधून बनावट प्रमाणपत्र दिले जात होते. स्थानिक गुन्हे शाखेला या गोरखधंद्याची कुणकुण लागताच या फोटो स्टुडिओवर सापळा रचून धाड टाकण्यात आली. दरम्यान आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असतांना ७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

बदनापूर येथील गुरुकृपा फोटो स्टुडिओ मध्ये बदनापूरच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण घेतल्याचे बनावट प्रमाण-पत्र फक्त २ हजारात विक्री केली जाते अशी गोपनीय माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एस चैतन्य यांना खबऱ्यामार्फत मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक एस चैतन्य ,अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंग गौर, पोलीस उपनिरीक्षक जयसिंग परदेशी यांच्यासह पोलीस हवालदार संतोष सावंत, पोलीस नाईक फुलसिंग घुसिंगे, फुलचंद हजारे, समाधान तेलंग्रे, सदाशिव राठोड, रवी जाधव यांनी सापडा रचून बदनापूर येथे गुरुकृपा फोटो स्टुडिओवर धाड टाकली व गुरुकृपा फोटो स्टुडिओचा चालक भगवान साहेबराव खांडेभराड व संतोष ज्ञानदेव मनभरे (रा. धोपटेश्वर) या दोन इसमांना १ जानेवारी रोजी ४ वाजता ताब्यात घेऊन जालना स्थानिक गुन्हा शाखेच्या कार्यालयात नेले.

जालना पोलीस अधीक्षक कार्यलयात गुन्हा शाखेत दोघांची रात्री उशिरा पर्यंत कसून चौकशी केल्यानंतर औधोगिक प्रशिक्षण संस्थेचे बनावट प्रमाणपत्र बनवून विक्री करीत असल्याप्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीना अटक करण्यात आली आहे ,या इसमांनी अनेक लोकांना महाराट्र राज्य तंत्र शिक्षण परिषदेची ( बोर्डाची) प्रमाणपत्रे बेकायदेशीररीत्या विक्री केल्याचे उघडकीस येण्याची शक्यता आहे,या रॅकेटमध्ये आणखी कोण कोण आहेत? याचा गुन्हे शाखा शोध घेत आहे. आरोपीच्या ताब्यातील काही बनावट प्रमाणपत्रासह संगणक, प्रिंटर्स, स्कँनर्स जप्त करण्यात आली असून, संगणकातून अनेकांना प्रमाणपत्र दिल्याचे समजते.