‘कास्टिंग काऊच’च्या मदतीने अनेक बड्या अभिनेत्री टॉपवर पोहोचल्या, इशाच्या गौप्यस्फोटाने खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूडमधील काळी बाजू आजपर्यंत अनेक अभिनेत्री, अभिनेते यांनी समोर आणली आहे. कास्टिंग काऊच ते नेपोटीझम यावर अनेक जण भरभरून बोलले आहेत. अनेक अभिनेत्रींनी Me Too चळवळीअंतर्गत कलाकारांचे कारनामे उघड करत कायदेशीर कारवाई साठी पुढाकार घेतला आहे. आता यात आणखी एका अभिनेत्रीचे नाव जोडले गेले आहे. अभिनेत्री इशा कोप्पिकर (Isha Koppikar) हिने अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत.

अभिनेत्री इशा कोप्पिकर (Isha Koppikar) हिने ‘हिंदुस्थान टाइम्स’शी संवाद साधताना बॉलिवूडमधील नेपोटीझम, कास्टिंग काऊच आणि ड्रग्ज संदर्भात मोकळेपणाने खुलासे केले. अनेक बॉलिवूड अभिनेत्री कास्टिंग काऊचच्या मदतीने टॉपवर पोहोचल्या असेही ती म्हणाली. यादरम्यान तिने ऋतिक रोशन याच्या एका चित्रपटातील संवादही उदाहरण म्हणून वापरला.

‘सुपर 30’ या चित्रपटात एक संवाद आहे. यात ऋतिक रोशन ‘अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, अब राजा वो बनेगा, जो हकदार होगा’, असे बोलतो. मात्र असे संवाद फक्त चित्रपटात चांगले वाटतात, सत्य वेगळेच असते, असे म्हणत मी मात्र माझ्या मेहनतीने इंडस्ट्रीत नाव कमावले असेही इशाने सांगितले.

नेपोटीझमवर बोलताना इशा म्हणाली की, नेपोटीझम म्हणा किंवा कोणाच्या फेव्हरमध्ये असणे म्हणा. यामुळे आउटसाइडर्सला नुकसान होते. मात्र असेही नाही की प्रत्येक स्टार किडस काही विशेष करून दाखवतात, अनेकदा आउटसाइडर्स मेहनतीच्या बळावर त्यांच्यापेक्षा जास्त काही मिळवतात. माधुरी दीक्षित, दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा यांनी हे सिद्ध करून दाखवले, असेही इशा म्हणाली.

इंडस्ट्रीत राजरोसपणे कास्टिंग काऊच चालते. मात्र तुम्हाला कास्टिंग काऊचच्या मदतीने पुढे जायचे की स्वतःच्या मेहनतीवर नाव कमवायचे हे सर्व तुमच्यावर अवलंबून आहे. अनेक बड्या अभिनेत्री याच्या सहाय्याने टॉपवर पोहोचल्या, असे विधान इशाने केले.