बॉलीवूडच्या ड्रग्ज रॅकेटचा मोठा आवाका, फॉरेन्सिक लॅबने एनसीबीकडे सोपवला 30 मोबाईल डाटाचा अंतिम अहवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

बॉलीवूडमधील ड्रग्ज रॅकेटचा मोठा आवाका असल्याचे चित्र समोर आले आहे. अंमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) गांधीनगरच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे या प्रकरणाचा डाटा चौकशीसाठी सोपवला होता. त्यापैकी 30 मोबाईल डाटाचा अंतिम अहवाल प्रयोगशाळेने सादर केला आहे. प्रयोगशाळेकडे एकूण 84 डिव्हाईस आले असून त्यातून आतापर्यंत 5 टीबी डाटा रिकव्हर करण्यात आला आहे. या डाटाची छपाई केल्यास तब्बल 5 लाखांहून अधिक प्रती निघू शकतात.

एनसीबीने बॉलीवूड कलाकार व मुंबईतील डझनभर ड्रग्ज पेडलरच्या 100 गॅझेट्समधून डाटा रिकव्हर करून दोन हार्डडिस्क प्रयोगशाळेकडे सोपवल्या होत्या. अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रिया चक्रवर्ती, रकुल प्रीत सिंह, करिश्मा प्रकाश, अर्जुन रामपाल व त्याच्या गर्लफ्रेंडसह काही दिग्दर्शकांच्या गॅझेट्सचा यात समावेश आहे. यामध्ये व्हॉट्सऍप चॅट, फोन कॉल्स, व्हिडीओ क्लिपिंग्जचा दोन वर्षांचा डाटा आहे. अभिनेता सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडच्या ड्रग्ज कनेक्शनचा पर्दाफाश झाला होता. या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे एनसीबीच्या हाती गेल्यानंतर बॉलीवूडचे धाबे दणाणले होते.

न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे बॉलीवूडच्या प्रसिद्ध कलाकारांचे 84 डिव्हाईस आहेत. यात मोबाईल, लॉपटॉप, पेन ड्राईव्ह आहेत. जसजसे एकेक डिव्हाईस अनलॉक होत आहे तसतशी नवनवीन गुप्त माहिती पुढे येत आहे. सेलिब्रिटींनी फोनमध्ये थ्री-लेयर कोड ठेवले होते. कुठल्याच सेलिब्रिटीने तपास यंत्रणेला अनलॉक कोड सांगितले नव्हते.

सेलिब्रिटींनी ऍण्ड्रॉइड फोन अनलॉक करण्यासाठी अत्याधुनिक सॉफ्टवेअर ठेवले होते. हे पेड सॉफ्टवेअर होते. या सॉफ्टवेअरच्या मदतीने फोटो, क्रीनशॉट, ऑडिओ व व्हिडीओ डेटा, व्हॉट्सऍप चॅट, एसएमएस, कॉल लॉग, सोशल मीडिया, व्हिडीओ कॉल लॉग सुरक्षित ठेवले होते.

एनसीबीने दिलेल्या फोनच्या चॅट आणि क्रीन शॉटमध्ये छोटय़ाछोटय़ा पाऊचमध्ये काळ्या रंगाची वस्तू दिसत आहे. ही वस्तू म्हणजे मारिजुआना असू शकतो, असे न्यायवैद्यक तज्ञांचे मत आहे.

मादक पदार्थांसाठी ‘डी’ आणि ‘डू’सारखे सिक्रेट कोड

न्यायवैद्यक प्रयोगशाळेने आतापर्यंत 35 डिव्हाईसमधून डाटा रिकव्हर केला आहे. काही सेलिब्रिटींची ड्रग्ज डीलर आणि कॅरिअरशी वारंवार बोलणी व्हायची. या चॅटिंगमध्ये मारिजुआना व इतर मादक पदार्थांच्या डिलीव्हरीसाठी डी आणि डू यांसारख्या सिक्रेट कोडचा वापर केला जायचा, अशी माहिती समोर आली आहे.