
>> संध्या सिनकर
नर्मदा ही आपली प्राचीन नदी आहे. नर्म ददाति इति नर्मदा. सुख देणारी ती नर्मदा. नर्मदेवर अनेक धरणे बांधली जात आहेत. या धरणांमुळे नर्मदेचा परिसर बदलतोय. प्राचीन परंपरा असलेली नर्मदा खोऱयातील संस्कृती, जैविक सृष्टी पाण्याखाली जाण्याआधी डोळे भरून पहावी असे लेखिका भरती ठाकूर यांना वाटले. विस्थापितांना नर्मदामाईला, आपलं घरदार व जमीन सोडून जाताना किती भावनिक यातना झाल्या असतील? हे दुःख त्यांनी कसे पचवले असेल, असे प्रश्न त्यांच्या मनाला पडले. नर्मदेच्या परिसरातील लोकजीवन बघताना स्वतःशीच संवाद करत तीन मैत्रिणींनी केलेले पदभ्रमण आणि त्यांना आलेले अनुभव या पुस्तकात आहेत. लेखिका भारती ठाकूर यांना निसर्गाची खूप ओढ आहे. त्यांना गिर्यारोहण व पदभ्रमण याची आवड आहे. तिघी मैत्रिणींनी परिक्रमा मेकल पर्वतावरील नर्मदेचे उगमस्थान असलेल्या अमरपंटकपासून 2005मध्ये केली. भारतीजीनी स्वतःच्या अंतर्मनाशी संवाद करताना त्याला सखी या व्यक्तिरेखेचं रूप दिलं आहे. सखीशी झालेल्या संवादातून आपल्याला त्यांच्या निर्मळ मनाचा व समृद्ध व्यक्तिमत्त्वाचा अनुभव येतो. या प्रवासात त्यांनी नर्मदा नदीची वेगवेगळी रूपे बघितली. कधी त्या दरीच्या बाजूने चिंचोळ्या रस्त्यावरून चालल्या, तर कधी जंगलातून फिरल्या. त्यांनी नर्मदेच्या अनेक उपनद्या कधी गुडघाभर पाण्यातून, तर कधी छातीपर्यंत पाण्यातून ओलांडल्या, अनेक प्रकारचे वृक्ष, प्राणी, पक्षी बघितले. परिक्रमेच्या मार्गावर त्यांना अनेक साधुसंत, वेगवेगळे परिक्रमावासी भेटले. परिसरातील गरीब माणसे ज्यांना एक वेळच्या जेवणाची भ्रांत आहे असे लोकसुद्धा परिक्रमावासीना सदाव्रत देतात. सुरुवातीला तिघी मैत्रिणींना हे खूप अवघड वाटले. पण स्वामी अर्ध्यानंदांनी त्यांना सांगितलं की, तुम्ही ज्याला भिक्षा मानता त्याला देणारा सदाव्रत म्हणतो आणि देणाऱयाला त्यामुळं आनंद होत असतो. या प्रथेतून मी, माझी सांपत्तिक स्थिती, शिक्षण व सामाजिक प्रतिष्ठा याविषयीचा अहंभाव गळून पडतो. परिक्रमेत मनातली इच्छा पूर्ण होते, असे अनुभवही भारतीजीना आले. परिक्रमेत तुमच्या जगण्याच्या कक्षा वाढत जातात. सीमित परिवार असीम होतो. वसुधैव पुटुम्बकम ही संकल्पना तुम्ही प्रत्यक्ष जगता. रोज सकाळी उठल्यावर तुम्ही पुणाकडे जेवणार, राहणार? काय खाणार? माहीत नसतं. सगळंच अनिश्चित असतं. या जगण्याला शुद्ध प्रारब्ध असं समर्पक नाव आहे. अमरकंटकहून चालू केलेली परिक्रमा परत अमरपंटकला आलो की पूर्ण होते. परिक्रमा पूर्ण झाली की तुम्ही होता तिथेच परत येता मूळ पदाला. भारतीजी म्हणतात, ‘‘ही परिक्रमा नव्हे तर ही अंतर्यात्रा. कर्मयोगाच्या मार्गावर साधनेची अखंड ज्योत हृदयात तेवत ठेवणारी… कधीही न संपणारी.’’
वेगवेगळ्या अनुभवांनी संपन्न झालेल्या या प्रवासाबरोबर लेखिकेचा आपल्या अंतर्मनाबरोबर म्हणजेच ‘सखी’बरोबर चालू असलेल्या संवादामुळे ‘नर्मदा परिक्रमा – एक अंतर्यात्रा’ हे भारती ठापूर यांचे पुस्तक वाचकांना अंतर्मुख करते.
भारतीजीना परिक्रमेने खूप अंतर्मुख केलं. मध्य प्रदेशातील निमाड परिसरात नर्मदेच्या काठी कापूस, तुरी व गव्हाची मोठी शेती आहे. पण आजूबाजूचे ग्रामवासी मात्र अतिशय गरीब आहेत. कारण त्यांच्याकडे जमिनी नाहीत. ते शेतात मजुरी करतात. परिक्रमेत असतानाच भारतीजीनी बाल शिक्षणाच्या क्षेत्रात काम सुरू करायचं ठरवलं. विवेकानंद पेंद्रातर्फे आसाममधील गोलघाट येथील शाळा चालवण्याचा त्यांना चार वर्षाचा अनुभव होता. सरकारी नोकरी सोडून त्यांनी मध्य प्रदेशातील मंडलेश्वरजवळ लेपा या गावी ‘नर्मदालया’ची स्थापना ऑगस्ट 2009मध्ये केली. बाल शिक्षण क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान आहे.
पुस्तक वाचताना आपल्याला नर्मदा काठचा सुंदर निसर्ग मोहित करतो. आजूबाजूच्या गावातील लोकांचं जीवन, गरिबी असली तरी त्यांची जीवनाविषयीची असलेली जाण मनाला भावते. सामाजिक बांधिलकीची जाणीव देणारे हे पुस्तक प्रत्येकाच्या संग्रही असायाला हवे.
नर्मदा परिक्रमा – एक अंतर्यात्रा
लेखिका – भारती ठाकूर
प्रकाशक – गौतमी प्रकाशन
पृष्ठ – 272, मूल्य – रुपये 255/-




























































