सीमावादप्रकरणी बोम्मईंचा गौप्यस्फोट; नड्डांचा मुख्यमंत्री शिंदेंना फोन, शांतता राखण्याचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bommai nadda eknath shinde

महाराष्ट्र-कर्नाटकचा सीमावाद चिघळण्याची शक्यता असून कर्नाटकचे मुख्यमंत्री अजूनही आक्रमक विधानं करत आहेत. सीमावादाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असताना देखील कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विविध विधानं करून वाद छेडला. यामुळे सीमाभागात तणाव निर्माण झाला. त्यानंतर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हैदोस घालत मराठी भाषिकांवर अन्याय अत्याचार केले. महाराष्ट्राने मात्र संयमाची भूमिका घेतली.

असे असताना देखील भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी बोम्मईंच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चार गोष्टी सुनवत शांतता राखण्यास सांगितले आहे. बोम्मईंच्या या गौप्यस्फोटामुळे भाजपची सीमावाद प्रकरणी नक्की भूमिका काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सीमाभागात कर्नाटक सरकारकडून दडपशाही सुरू असताना संयम राखणाऱ्या एकट्या महाराष्ट्राला शांतता राखण्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष का सांगत आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी गुरुवारी सांगितले की त्यांनी महाराष्ट्रासोबतच्या सीमेवरील वादावर कर्नाटकची भूमिका भाजपच्या हायकमांडला कळवली आहे आणि राज्य या मुद्द्यावर तडजोड करणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा जुना वाद सोडवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्तक्षेपाची मागणी केल्याचे विचारले असता, संतापत बोम्मई म्हणाले की, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी आधीच बोललो आहे आणि स्पष्ट केले आहे की कर्नाटक एक इंचही जागा महाराष्ट्राला देणार नाही.

शहा यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. ‘नड्डा यांनीच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून शांतता राखण्यास सांगितले होते’, असेही ते म्हणाल्याचे टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटले आहे.

बोम्मई म्हणाले की, त्यांच्या सरकारने शेजारच्या राज्यात राहणार्‍या कन्नडिगांच्या जीवनाचे आणि मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी सर्व खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. यासंदर्भात मी महाराष्ट्राचे डीजीपी आणि मुख्य सचिवांशी बोललो आहे’, असेही ते म्हणाले.