
कोरोनाच्या लाटेचा सामना आणि राजकारणाच्या धांदलीत मग्न असलेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपले लग्न गुपचूपरीत्या उरकले असल्याची बातमी वेगाने पसरली आहे. आपली 33 वर्षीय प्रेयसी कॅरी सायमंडसोबत ते लग्नबंधनात अडकले आहेत. हा विवाहसोहळा वेस्टमिन्स्टर पॅथड्रल चर्च येथे पार पडला. द सन आणि मेल या स्थानिक वृत्तपत्रात याबाबतची बातमी देण्यात आली आहे. जॉन्सन यांच्या कार्यालयातून मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. वेस्टमिनिस्टर पॅथड्रल चर्च परिसरात शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास अचानक लॉकडाऊन करण्यात आला. त्यानंतर कॅरी सायमंड अर्धा तासाने गाडीतून तिथे आल्या. त्यांनी पांढराशुभ्र लांब वधूचा ड्रेस परिधान केला होता. पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे 56 वर्षांचे असून त्यांचा हा तिसरा विवाह आहे. अतिशय गुप्त पद्धतीने पार पडलेल्या शनिवारच्या या सोहोळ्याला केवळ 30 जणच उपस्थित होते. त्यात जॉन्सन यांचा 1 वर्षीय पुत्र विल्फ्रेड याचाही समावेश होता. जॉन्सन पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर 2019 पासून ते कॅरी यांच्यासोबत डाउनिंग स्ट्रीटमधील घरात एकत्र राहत आहेत. गेल्या वर्षी त्यांचा साखरपुडा झाल्याचे जाहीर झाले होते. उभयता जुलै 2022 मध्ये लग्न करणार असल्याची निमंत्रणपत्रिका द सन या वृत्तपत्राने छापली होती. मात्र त्यापूर्वी या दोघांनी लग्न केल्याचे आता सांगण्यात येत आहे.

























































