सुप्रिया सुळेंनी ब्रीच कॅण्डी रुग्णालयाच्या गेटवरून गाजवली पंढरपूरची सभा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची धामधूम सुरू आहे. विविध पक्षांच्या नेत्यांच्या सभाही होत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात शस्त्र्ाक्रिया झाल्यामुळे ते या धामधुमीत सहभागी झालेले नाहीत. मात्र, आज खासदार सुप्रिया सुळे यांनी ब्रीच कॅण्डी रुग्णालयाच्या गेटवरून सभेत ऑनलाइन सहभागी होत जोरदार बॅटिंग करत सभा गाजवली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होत आहे. राष्ट्रवादीकडून भगीरथ भारत भालके, तर भाजपकडून समाधान आवताडे निवडणूक लढवित आहेत. या उमेदवारांच्या प्रचारार्थ आतापर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सभा झालेल्या आहेत. या नेत्यांच्या सभांमुळे निवडणुकीमध्ये रंगत वाढली आहे. त्यातच आज पंढरपुरातील सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी ऑनलाइन सहभाग घेत सभा गाजवली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरू असून, खासदार सुप्रिया सुळे त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे पंढरपुरातील प्रचारात सहभागी झालेल्या नाहीत. मात्र, भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ एकातरी सभेत आपला सहभाग असावा, या उद्देशाने खासदार सुळे आज सायंकाळी झालेल्या सभेमध्ये ऑनलाइन सहभागी झाल्या, असे राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी सांगितले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, पंढरपूर स्वच्छ, सुंदर आणि सुशोभित कसे करता येईल, याबाबत भालके नाना आणि आम्ही आराखडा बनवत होतो. मात्र, नाना अर्धवट साथ सोडतील असे वाटले नव्हते. त्यामुळे खूप विश्वासाच्या नात्याने भगीरथ भालके यांना ही जबाबदारी दिली आहे. आपण भालके नानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जमलो आहोत, त्यामुळे नानांची अर्धवट राहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी भगीरथ भालके यांना सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी यावेळी केले.