बीएस येडियुरप्पा यांची मोठी घोषणा, निवडणुकीच्या राजकारणातून घेतली निवृत्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री बीएस युडियुरप्पा यांनी मोठी घोषणा केली आहे. येडियुरप्पा यांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीला अवघे दोन महिने शिल्लक असताना येडियुरप्पा यांनी ही घोषणा केल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

येडियुरप्पा हे भाजपच्या केंद्रीय संसदीय समितीचे सदस्यही आहेत. त्यांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली असली तरी त्यांनी राजकारणात सक्रिय राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पत्रकारांना संबोधित करताना येडियुरप्पा म्हणाले की, “मी आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नाही. तसेच भविष्यात कोणतीही निवडणूक लढवण्याचा माझा विचार नाही. मी आता 80 वर्षांचा असल्याने यापुढे मी निवडणूक लढवू शकत नाही”.

“यापुढे आपण सक्रिय राजकारणात राहणार असून, राज्यात पुन्हा भाजपचे सरकार आणणे हेच आपले ध्येय असल्याचे ते म्हणाले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुन्हा एकदा सत्ता आणणे हेच माझे ध्येय” असल्याचे ते म्हणाले. येडियुरप्पा निवडणूक लढवणार नसले तरी त्यांचे पुत्र बीवाय विजयेंद्र हे पक्षात मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत. विजयेंद्र हे शिकारीपुरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी यापूर्वी जाहीर केले होते.