कोणत्याही आघाडीत जाणार नाही! मायावतींची घोषणा

mayawati-new

बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी आपला पक्ष कोणत्याही आघाडीत सामील होणार नाही असे जाहीर केले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुका असोत अथवा आगामी विधानसभा निवडणुका आपण स्वबळावर लढणार असल्याचे मायावती यांनी जाहीर केली आहे. एकीकडे भाजपने एनडीएच्या जोरबैठकांना सुरूवात केली आहे तर दुसरीकडे विरोधकही आपल्या एकीची मूठ घट्ट करत आहेत. तुम्ही कोणासोबत जाणार असा प्रश्न विचारला असता मायावती यांनी आपण कोणासोबतही युती, आघाडी करणार नाही असे सांगितले आहे.

मंगळवारी एनडीए आणि युपीएच्या बैटका पार पडल्या. संयुक्त पुरोगामी आघाडीने आपला विस्तार करत आघाडीचे नवे नाव इंडिया जाहीर केले. इंडियामध्ये 26 पक्षांचा समावेश आहे तर भाजपप्रणित एनडीएमध्ये 38 पक्ष एकत्र आले आहेत. या दोन्ही बैठकांकडे मायावती यांच्या पक्षाने पाठ फिरवली होती. त्यामुळे त्यांचा पाठिंबा नेमका कोणाला आहे असा प्रश्न विचारला जात होता.

मायावती यांनी काँग्रेसवरही या निमित्ताने टीका केली. काँग्रेसची वचने खोटी असून काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत येण्यासाठी आघाड्या करत असल्याचा आरोप मायावती यांनी केला आहे. उत्तर प्रदेशात 80 लोकसभा मतदारसंघावर बसपाचा प्रभाव असल्याचे सांगितले जाते. दलित मतांवरील त्यांची पकड घट्ट असल्याचेही सांगितले जाते. मायावती यांनी आपण उत्तर प्रदेशासोबत राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगाणामध्येही स्वबळावर निवडणुका लढवेल असं जाहीर केलं आहे.