
बुलढाणा जिल्ह्यातल्या 10 पैकी 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी28 एप्रिलला मतदान झाले. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या मतमोजणीनंतर हाती आलेल्या निकालात जिल्ह्यात महाविकास आघाडीने बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. 5 पैकी 3 बाजार समित्यांवर महाविकास आघाडीने बाजी मारली. बुलढाण्यात महाविकास आघाडीला 12 तर शिंदे गटाला आणि भाजपला 6 जागा मिळाल्या. देऊळगावराजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या सहकारातील वर्चस्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. 18 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीचे पॅनल विजयी ठरले, तर 3 जागा भाजप-शिंदे गट युतीला मिळाल्या. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार सानंदा यांनी त्यांचा गड शाबूत ठेवला. मलकापुरात चैनसुख संचेतांrच्या नेतृत्वाखाली भाजपने विजय मिळवला, तर मेहकरच्या चुरशीच्या लढतीनंतर खासदार जाधवांच्या भूमिपुत्र पॅनलने विजय मिळवला. भूमिपुत्र पॅनलला 11 तर महाविकास आघाडीला 7 जागा मिळाल्या.
उद्या पाच बाजार समित्यांची निवडणूक
शुक्रवारी झालेल्या पाच बाजार समित्यांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने माफक यश मिळवत भाजप-शिवसेनेला फटका दिला आहे. आता रविवारी जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांसाठी निवडणूक होत असून त्यात 90 जागांसाठी 7 हजार 982 मतदार मतदान करणार आहेत.
























































