बार्शी पंचायत समिती सभापतीचा ‘आरटीआय’ कार्यकर्त्यावर गोळीबार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माहिती अधिकाराखाली ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या कारभाराची माहिती मागविल्याच्या रागातून बार्शी पंचायत समितीचे सभापती अनिल डिसले यांनी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रमोद गणपत ढेंगळे यांच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. ढेंगळे हे थोडक्यात बचावले असून, याप्रकरणी वैराग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिसले हे भाजपचे आमदार राजेंद्र राऊत यांचे कट्टर समर्थक आहेत.

प्रमोद गणपत ढेंगळे (रा. जोतिबाची वाडी, जवळगाव, बार्शी) यांनी काही दिवसापूर्वी वैराग ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या कारभारासंबंधी माहिती अधिकाराखाली माहिती मागितली होती. याचा राग पंचायत समितीचे विद्यमान सभापती अनिल डिसले यांना होता. दरम्यान, प्रमोद ढेंगळे यांनी कोल्हापूर महानिरीक्षक व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे अनिल बाबूराव डिसले (सभापती), सुरेश विश्वनाथ कापसे, वेंकटेश कृष्णात ढेंगळे यांच्यापासून जिवाला धोका असल्याची तक्रार दिली होती. याचाही त्यांना राग होता. घटनेच्या दिवशी जोतिबाची वाडी बस स्थानकावरून प्रमोद ढेंगळे घरी जात असताना अनिल डिसले यांच्या डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून शिवीगाळ सुरू केली. ढेंगळे यांना ठार मारण्याची धमकी देत असताना काहीजणांनी मध्यस्थी करून भांडण सोडविले. यावेळी ‘मी तालुक्याचा सभापती आहे. एक-दोन मर्डर सहज खपवू शकतो, आमदार आमचाच आहे. याअगोदर दिलेल्या तक्रारीचे काय झाले, हे तुम्हाला माहीत आहे,’ असे म्हणत डिसले यांनी ढेंगळे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे घाबरलेले ढेंगळे हे पळत असताना डिसले याने पाठलाग करून त्यांच्यावर गोळी झाडली. यातून थोडक्यात बचावल्याने ते घरात लपून बसले होते. प्रमोद ढेंगळे यांनी वैराग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस निरीक्षक विनय बहिर तपास करीत आहेत.