
सामना प्रतिनिधी , मुंबई,
अहमदाबाद-मुंबई या देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाची आखणी सुरू असली तरी बुलेट ट्रेनला जमीन देण्यास गावकरी तयार नसल्याने हा प्रकल्प अडचणीत सापडला आहे. या मार्गाची केवळ चारच स्थानके महाराष्ट्रात येत असल्याने तो महाराष्ट्राच्या उपयोगाचा नसल्याचा आरोप पहिल्यापासून होत आहे. शिवाय या मार्गावरील तीन स्थानके गुजरातमधील सध्याच्या रेल्वे स्थानकांशेजारीच बांधली जात असल्याने त्याचे बांधकाम वेळेत पूर्ण करण्याचे अवघड शिवधनुष्य पेलावे लागणार आहे.
508 किलोमीटरचा बुलेट ट्रेनचा मार्ग महाराष्ट्र, गुजरात, केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली यांच्या हद्दीतून जाणार आहे. या मार्गावर साबरमती, अहमदाबाद, आणंद, वडोदरा, भरूच, सुरत, बिलिमोरा, वापी ही गुजरातमधील आठ स्थानके तर महाराष्ट्रातील बोयसर, विरार, ठाणे आणि बीकेसी ही चार स्थानके येत आहेत. सुरुवातीला दहा डब्यांची 750 प्रवाशांना घेऊन जाणारी बुलेट ट्रेन सर्व स्थानकांवर थांबा घेतल्यास 2 तास 57 मिनिटांत मुंबई ते साबरमती गाठेल, तर मोजक्या स्थानकांवर थांबा घेतल्यास याच अंतरास 1 तास 58 मिनिटे लागतील. या मार्गावरील सुरुवातीचे स्थानक साबरमती हे ‘साबरमती हब’ म्हणून मल्टिमोड ट्रान्स्पोर्ट म्हणून विकसित केले जात आहे. या इमारतीसाठी महात्मा गांधींच्या दांडी यात्रेची थिम वापरली जाणार आहे.
वडोदरा येथे जपानपेक्षा मोठा गर्डर
बुलेट ट्रेनचा मार्ग पश्चिम रेल्वेच्या सध्याच्या महत्त्वाच्या वडोदरा, अहमदाबाद आणि साबरमती या रेल्वे स्थानकांना छेदत जाणार असल्याने तेथे बांधकाम करणे मोठय़ा कौशल्याचे ठरणार आहे. वडोदरा येथे 240 मीटरचा स्पॅन असलेला सर्वात मोठा स्टीलचा ब्रिज बांधला जाणार आहे. जपानच्या बुलेट ट्रेनसाठी बांधण्यात आलेल्या ब्रिजपेक्षा याचा विस्तार प्रचंड असणार आहे. पश्चिम रेल्वेच्या वडोदरा रेल्वे स्थानकाचा सध्याचा प्लॅटफॉर्म क्र. 7 हटवून त्या जागी बुलेट ट्रेनचे एलिवेटेड स्थानक/फलाट बांधला जाणार आहे. त्यासाठी जवळच पर्यायी छायापुरी रेल्वे स्थानक विकसित केले जाणार असल्याचे चीफ प्रोजेक्ट मॅनेजर प्रदीप अहिरकर यांनी सांगितले.
समुद्राखालून जाणारा देशातला पहिला बोगदा ठरणार
बुलेट ट्रेनचा 92 टक्के ट्रक हा उन्नत स्वरूपाचा एलिवेटेड टॅक असणार असून बीकेसी वगळता अन्य सर्व स्थानकेही एलिवेटेड असणार आहेत. संपूर्ण मार्गावर आठ बोगदे असणार असून 21 किलोमीटरचा सर्वात मोठा बोगदा बीकेसी ते दिव्यापर्यंत असणार आहे. त्यातील सात किलोमीटर भाग ठाण्याच्या खाडीखालून जाणार आहे. एलिवेटेड ट्रक असल्याने पुराच्या पाण्याची भीती राहणार नसून पारंपरिक रेल्वे मार्गाला 36 मीटरची जागा लागत असून बुलेट ट्रेनला केवळ 17.5 मीटर रुंदीची जागा लागते. त्यातही चार मीटर सर्वसामान्यांसाठी सर्व्हिस रोड राहणार आहे. तो वाहनचालकांना वापरता येणार आहे.
24 हजार कोटींची गुंतवणूक
बुलेट ट्रेनसाठी ठाण्यात मेटेंनन्स आणि कोचिंग डेपो बांधण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात चारच स्थानके असली तरी बुलेट ट्रेनमुळे 24 हजार कोटींची गुंतवणूक होणार असल्याचे म्हटले जात आहे.
डिलाईल रोड येथील शिवसेना शाखा क्रमांक 198 च्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवात माजी महापौर महादेव देवळे यांनी सहभागी होऊन हंडी फोडली. यावेळी मोठय़ा संख्येने गोविंदा सहभागी झाले होते. हंडी फोडल्यानंतर गोविंदांनी मोठा जल्लोष केला. या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. त्यामुळे ही हंडी पाहण्यासाठी मोठय़ा संख्येने गर्दी झाली होती.































































