दोन हजारांची बंडले पन्नास खोकेवाल्यांकडे ! संजय राऊत यांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘मोदी सरकारने दुसरी नोटबंदी केली. दोन हजार रुपयांची नोट चलनातून बाद केली. पण दोन हजार रुपयांची नोट आहे कुणाकडे? पहिल्या नोटबंदीनंतर गोरगरीबांकडे नोटाच राहिल्या नाहीत. दोन हजारांची बंडले पन्नास खोकेवाल्यांकडे नक्कीच आहेत, भाजपच्या शेठजींकडेही बंडलांच्या चळती आहेत!’ असा घणाघात शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी केला.

बीड येथे शनिवारी ग्रामीण भागातील महाप्रबोधन यात्रेचा समारोप झाला. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकार, भाजपची सालटी काढली. याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, उपनेत्या सुषमा अंधारे, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, संपर्कप्रमुख बबनराव थोरात, संजय सावंत, माजी आमदार सुनील धांडे, जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब अंभुरे, माजी मंत्री बदामराव पंडित, विलास महाराज शिंदे, महिला आघाडीच्या संपदा गडकरी, संगीता चव्हाण आदींची उपस्थिती होती.

कोर्टाने लाथा घालूनही लाज वाटत नाही!

सत्तासंघर्षाचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने मिंधे सरकारला जबरदस्त लाथा घातल्या. हे सरकारच न्यायालयाने बेकायदेशीर ठरवले. उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला नसता तर आम्ही पुन्हा त्यांचे सरकार आणले असते, असे न्यायालय म्हणाले. न्यायालयाने एवढय़ा लाथा घालूनही यांना लाज वाटत नाही, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

गद्दारांना 50 कोटींचा शिधा

राज्यातील सरकार आपण गरीबांचे कैवारी असल्याचा आव आणते. गोरगरीबांना आनंदाचा शिधा दिला जातो. शंभर रुपयांत काय तर एक किलो साखर, एक किलो चणाडाळ अन् पामतेल! गद्दार, लफंगे, चोरांना 50 कोटींचा शिधा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. सभेला येताना श्यामसुंदर पाटील नावाचा शेतकरी भेटला. त्याने एक पत्र दिले. 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीचे अनुदान अजून मिळाले नाही. साहेब, तुम्ही जिल्हाधिकाऱयांना बोला, अशी कळकळीची विनंती त्याने केली. कुठे आहे सरकार? काय करत आहे? सरकारला शेतकऱयांचे अश्रू दिसत नाहीत का? असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला.

कर्नाटकात मोदींचा फोटो लावला होता ना…

महाराष्ट्रात आम्ही मोदींचा फोटो लावून जिंकलो असा आरोप भाजपवाले करतात. कर्नाटकात मोदींचाच फोटो लावला होता ना! तिकडे काय झाले? 36 सभा, 27 रोड शो मोदींनी करूनही जनतेने झिडकारले. मोदींनी प्रचार केलेल्या सर्व जागा पडल्या. हिंमत असेल तर महाराष्ट्रात गद्दारी करणाऱयांनी मोदींचाच फोटो लावून निवडणूक लढवावी, असे आव्हान यावेळी संजय राऊत यांनी दिले.