
सामना ऑनलाईन । मोखाडा
साईबाबांचे दर्शन घेऊन शिर्डीहून गुजरातकडे परतणाऱ्या भक्तांवर आज मृत्यूने घाला घातला. या साईभक्तांची खासगी बस मोखाड्याच्या तोरंगणा घाटातील 30 फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात सहाजण जागीच ठार झाले तर 45 जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना विविध शासकीय रुग्णालयांमधे दाखल केले आहे.सुरतमधील 56 साईभक्त लक्झरी बसने
शिर्डीला साईंच्या दर्शनासाठी गेले होते. शिर्डीहून गुजरातकडे येत असताना तोरंगणा घाटात बसचे ब्रेक निकामी झाले आणि ती थेट दरीत कोसळली. यात सहा साईभक्तांचा जागेवरच मृत्यू झाला. मृतांची नावे समजू शकली नाहीत. 12 जखमींना नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तर अन्य जखमींना त्र्यंबकेश्वर व मोखाड्याच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे.
मृत्यूचा सापळा
मोखाडा-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील तोरंगणा घाट म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे. या घाटात अनेक नागमोडी वळणे असून आठवड्यातून एक अपघात होतो. आतापर्यंत अनेकांना या घाटातील अपघातांमुळे आपले प्राण गमवावे लागले होते. वर्षापूर्वी येथे बोअरवेलची गाडी उलटून चारजणांचे बळी गेले होते. त्यामुळे या घाटात तातडीने सुरक्षेचे उपाय योजावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
























































