
पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील लासबेला येथे रविवारी सकाळी बस दरीत कोसळून भीषण अपघात घडला. या अपघातात 41 जणांना आपला जीव गमवावा लागला. ही बस 48 प्रवाशांसह क्वेटाहून कराचीला जात होती. यावेळी बस लासबेला येथे आली असता खोल दरीत कोसळली. यात 41 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार बसमध्ये सुमारे 48 प्रवासी होते. ही बस दरीत कोसळल्यानंतर तिला आग लागली. भरधाव वेगात यू-टर्न घेत असताना हा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस प्रथम एका खांबाला धडकली आणि नंतर खोल दरीत कोसळली. बसमधील बहुतांश लोकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. मृतदेह पूर्णपणे जळाल्याने मृत प्रवाशांची ओळख पटवणेही कठीण झाले होते.
मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याचे आयुक्त हमजा अंजुम यांनी सांगितले. मृतांचा डीएनए त्यांच्या नातेवाईकांच्या डीएनएशी जुळवून ओळख पटवण्यात येणार आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात एक महिला आणि एका मुलासह तिघांचे प्राण वाचले. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असून, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

























































